कडोंमपामधील कार्मचाऱ्यांचा वेळ घेणाऱ्या अभ्यागतांवर टाच
कल्याण-डोंबिवली पालिका मुख्यालयात सकाळी १० वाजता कार्यालय सुरूझाल्यापासून प्रत्येक विभागात अभ्यागतांची वर्दळ असते. या वर्दळीमुळे कर्मचाऱ्यांना आपल्या कामाची सुरुवात त्यांचे स्वागत करूनच करावी लागते. अशा प्रकारे सगळा बेशिस्त प्रकार पाहून, आयुक्त ई. रवींद्रन यांनी पालिकेच्या प्रशासकीय मुख्यालयात सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत कोणाही अभ्यागताला प्रवेश देऊ नये, असे आदेश काढले आहेत.
या आदेशामुळे सकाळी पालिका मुख्यालय उघडले की, पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडून बसलेल्या ठेकेदार, मजूर कंत्राटदार, काही विकासक, त्यांचे सहकारी, माहिती अधिकार कार्यकर्ते यांची मोठी अडचण झाली आहे. त्यांनी या आदेशाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमची कामे आम्ही कधी करून घ्यायची, असा प्रश्न या मंडळींकडून उपस्थित केला जात आहे.
आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर प्रशस्त अभ्यागत कक्ष होता. या कक्षात नऊ आराम बाकडे ठेवण्यात आले होते. सकाळी १० वाजल्यापासून काम नसणारी मंडळी या बाकडय़ांवर बसून आराम करीत असत. आयुक्त रवींद्रन यांनी अनेक वेळा दालनात जाण्यापूर्वी बाकडय़ांवर बसणाऱ्या अभ्यागतांना ‘तुम्ही कोण आहात. तुमचे काय काम आहे,’ अशा प्रश्नांची सरबत्ती केली होती. त्या वेळी अनेकांची उत्तरे देताना बोबडी वळली, तर काहींनी आम्हाला नगररचना विभागात काम आहे, असे सांगून वेळ मारून नेली. सकाळपासून ते संध्याकाळी उशिरापर्यंत नगररचना विभागात गर्दी कोणाची आणि कशासाठी असते, हा प्रश्नही आयुक्तांना भेडसावत होता. नगररचना विभागातील ‘नाटके’ आयुक्तांना समजली. नगररचना विभागाचे सर्वाधिकार आणि या विभागातील प्रत्येक नस्ती (फाइल्स) आपल्या विभागात आली पाहिजे, असे आदेश आयुक्तांनी दिल्यानंतर, नगररचना विभागातील सकाळपासून रात्री उशिरापर्यंत होणारी गर्दी कमी झाली आहे.
काही माहिती अधिकार कार्यकर्ते बिनधास्तपणे प्रत्येक विभागात जाऊन कोणत्या टेबलवर काय काम चालू, कोणते पत्र टंकलिखित होत आहे. मंत्रालयातून कोणते पत्र आले आहे, याची माहिती घेऊन त्याचा प्रसार आणि त्याप्रमाणे माहिती अधिकार अर्ज टाकण्यासाठी सक्रिय होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. काही पत्रकारही सकाळपासून विविध विभागांत फिरून कर्मचाऱ्यांकडून बातम्या काढण्यात गर्क असत. कर्मचाऱ्यांना काम करून देण्यात अभ्यागत हाही मोठा अडथळा असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यानंतर आयुक्तांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे.
आदेशाचे स्वरूप..
पालिका मुख्यालयातील प्रशासकीय इमारतीत दुपारी दोनपूर्वी कुणाही अभ्यागताला कार्यालयात सोडण्यात येऊ नये. अधिस्वीकृतीधारक पत्रकार असेल तरच त्यांना मुख्यालयात सोडण्यात यावे. सर्व पालिका पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक यांना प्रशासकीय वेळेत कोणत्याही वेळी प्रवेश करण्याची मुभा असणार आहे. पालिका कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामासाठी प्रशासकीय इमारतीत प्रवेश आहे, परंतु सामान्य प्रशासन विभागातील आपल्या खासगी कामासाठी कर्मचाऱ्यांनी दुपारी ३ नंतरच प्रवेश घ्यावा. सुरक्षारक्षकांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.