अंबरनाथः अंबरनाथ शहरातील जाहिरात फलक मुक्त आणि शहराच्या पूर्व भागातील कोंडी फोडण्यासाठी महत्वाचा ठरलेल्या पहिल्या बाह्यवळण रस्त्याची मोठी जाहिरात अंबरनाथ पालिकेच्या वतीने करण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा महत्वाचा रस्ता अंधारात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाहन चालकांना अंधारात प्रवास करावा लागत असून रस्त्याच्या कडेला मद्यपी आणि प्रेमी युगलांचा वावर वाढू लागला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील पथदिव्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात आनंद नगर येथे मोठी औद्योगिक वसाहत आहेत. हजारो कामगार, प्रवासी वाहतूक या औद्योगिक वसाहत ते अंबरनाथ रेल्वे स्थानकापर्यंत होत असते. ही वाहतूक लोकनगर ते वडवली आणि स्वामी समर्थ चौक किंवा वेल्फेअर चौक या मार्गाने होत होती. या मार्गावर मोठ्या बस आणि वाहनांमुळे मोठी कोंडी होत होती. या कोंडीमुळे वाहतुकीचा वेग मंदावत होता. त्याचा स्थानिकांनाही फटका बसत होता. यावर उपाय म्हणून लोकनगरी स्मशान ते गोविंदतीर्थ पुलापर्यंत बाह्यवळण रस्ता उभारण्यात आला. या रस्त्यामुळे शिवाजीनगर, वडवली चौक भागातील कोंडी फुटली. हा रस्ता शहरातल्या वाहतुकीसाठी वरदान ठरला. या रस्त्यामुळे वाहतूक वेगवान झाली. या रस्त्याचे दुभाजक, रस्त्याचा आजुबाजूचा परिसर चांगल्या प्रकारे विकसित करण्यात आला. हा मार्ग जाहिरात, बॅनरमुक्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतल्यानंतर या मार्गावर कोणतेही फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हा मार्ग नागरिकांच्या फेरफटका मारण्यासाठीही फायद्याचा ठरतो आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा महत्वाचा बाह्यवळण मार्ग अंधारात गेला आहे.

हेही वाचा – ठाणे : आदिवासींची पायपीट थांबणार, पाड्यांना जोडण्यासाठी रस्त्यांचा प्रस्ताव

हेही वाचा – ठाण्यात टीएमटी प्रवाशांचे हाल, वाहकांच्या कमतरतेमुळे बसगाड्यांचा तुटवडा

रात्रीच्या वेळी मार्ग अंधारात गेल्याने वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोर जावे लागते आहे. या मार्गावर रात्री आणि पहाटे लवकर अनेक नागरिक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. मात्र त्यांनाही या अंधाराचा फटका बसतो आहे. या अंधाराच फायदा घेत काही मद्यपी येथे बसू लागले आहेत. तसेच प्रेमीयुगलांचीही गर्दी येथे होऊ लागली आहे. यामुळे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambernath city only bypass road in darkness inconvenience to motorists ssb