अंबरनाथः प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या दर्जाबाबतच्या नियमांची पूर्तता होत नसल्याने अंबरनाथच्या आनंदनगर अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ९ वर्षानंतरही सुरू होऊ शकलेला नाही. क्रिस्टल एक्वाकेम जेवी या कंपनीला हा प्रकल्प चालवण्यासाठी तीन वर्षांपूर्वी कंत्राट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या दर्जाबाबतचे जे निकष अंबरनाथच्या या प्रकल्पाला लावले जात आहेत. त्याच निकषांना बदलापुरच्या सांडपाण्याला सुट दिली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उभारणीपासून विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात  सापडलेला आनंदनगरच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ९ वर्षांनंतरही बंदच आहे. विविध अडचणींमुळे बंद असलेला हा प्रकल्प गेल्या वर्षी सुरू केल्याची घोषणा एमआयडीसी प्रशासनाने केली होती. त्यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे तत्कालिन कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांनी २१ जून २०२१ रोजी हा प्रकल्प सुरू केला जात असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी काही कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर सांडपाण्याच्या नव्या वाहिन्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करून सांडपाणी सोडण्याच्या कामाचा मुहुर्त केला होता. मात्र या सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या दर्जाबाबत साशंकता असल्याने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने हा प्रकल्प सुरू करण्यासाठी परवानगीच दिली नसल्याचे समोर आले. तसेच या प्रक्रिया केंद्रातून निघणारे पाणी थेट खाडीत सोडण्यासाठी आवश्यक वाहिनीचे काम अद्याप रखडलेले आहे. त्यामुळेही परवानगी दिली जात नाही. परिणामी अनेक कंपन्यांना आजही महागड्या आणि खर्चिक अशा स्वतःच्या प्रक्रियांवर अवलंबून रहावे लागते आहे. या प्रकल्पातून बाहेर पडणारे प्रक्रिया झालेले सांडपाणी अजूनही त्या दर्जाचे आणि निकषाला धरून नसल्याचा खुलासा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने केला आहे. त्यामुळे नऊ वर्षांनंतरही प्रकल्प सुरू करण्यात यश आलेले नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambernath waste water plant faces regulatory permission ysh
First published on: 10-08-2022 at 12:05 IST