ठाणे : महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत पालिका निवडणूक विभागाला प्राप्त झालेल्या १,९६४ पैकी ९०९ हरकती प्रभागांच्या हद्दीबाबतच्या आहेत. तर उर्वरित हरकती मतदार यादी, आरक्षणसंबंधीच्या आहेत. चार सदस्यांचा प्रभाग असलेल्या साबे, दिवा या प्रभागातून सर्वाधिक म्हणजेच ३३५ हरकती प्राप्त झाल्या असून त्यामध्ये हद्दीबाबतच्या केवळ तीनच तक्रारींचा समावेश आहे.
उर्वरित ३३२ हरकती मतदार यादी, आरक्षणासंबंधीच्या आहेत. या प्रभागापाठोपाठ कोपरी कॉलनी प्रभागातून २०३, खारकर आळी प्रभागातून १८९ आणि आनंदनगर, कशीश पार्क प्रभागातून १८४ हरकती पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. काही हरकतींचा मजकूर सारखाच असून नावे मात्र वेगळी आहेत. या हरकतींवर येत्या २६ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिका निवडणुकसाठी तयार करण्यात आलेली प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली असून त्यावर पालिका निवडणूक विभागाने हरकती व सूचना मागविल्या होत्या. १४ दिवसांच्या कालावधीत पालिका निवडणूक विभागाकडे एकूण १,९६४ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यात कोणत्या प्रभागासाठी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, याचा निवडणूक विभागाने नुकताच आढावा घेतला असून प्रभाग समितीनिहाय हरकतींची यादी तयार केली आहे.
महापालिकेच्या एकूण ४७ प्रभागांसाठी प्राप्त झालेल्या १,९६४ तक्रारींपैकी ९०९ तक्रारी या प्रभागांच्या हद्दीसंबंधीच्या आहेत. यामध्ये किसननगर क्रमांक – २ या २५ क्रमांकाच्या प्रभागातून सर्वाधिक म्हणजेच १६३ हरकती आल्या आहेत. त्यापाठोपाठ घोडबंदरमधील हिरानंदानी इस्टेट प्रभाग क्रमांक दोन मधून ७८ तर, ब्रह्मांड कोलशेत या ३ क्रमांकाच्या प्रभागातून ५७ हरकती आल्या आहेत.
कोपरी परिसरातील काही भाग इतर प्रभागांना जोडण्यात आल्याने या भागातील नगरसेवक संख्या एकने कमी झाली असून यामुळे कोपरीवासीयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. यातूनच कोपरी परिसराशी संबंधित प्रभागांच्या तक्रारी सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.
प्रभाग कमी झाल्याने नाराजी
वाढलेल्या लोकसंख्येमुळे दिवा परिसरात प्रभागांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात नव्या प्रभाग रचनेत याठिकाणी नगरसेवक संख्येत कपात होऊन नगरसेवक संख्या सात इतकी करण्यात आली आहे. त्यासाठी साबे, दिवा, दातिवली परिसरांचा मिळून चार नगरसेवकांचा एक प्रभाग तयार करण्यात आला आणि या प्रभागाची लोकसंख्या ५७ हजार इतकी आहे. आगासन, बेतवडे, म्हातार्डी, दातिवली या भागांचा मिळून तीन सदस्यांचा एक प्रभाग करण्यात आला. या भागाची लोकसंख्या ४२ हजार ७१५ इतकी आहे. तसेच दिवा परिसरातील साबे, डवले ही गावे शीळ डायघर भागाला जोडून तीन सदस्यांचा एक प्रभाग करण्यात आला. या प्रभागाची लोकसंख्या ३८ हजार८०४ इतकी आहे. निवडणूक विभागाने आखून दिलेल्या लोकसंख्येच्या नियमानुसार दिवा परिसरात तीन सदस्यांचे तीन प्रभाग होऊ शकले असते, असा दावा करत सत्ताधारी शिवसेनेने प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला होता. यातूनच या प्रभागात सर्वाधिक हरकती आल्याचे चित्र आहे.