दर दहा वर्षांनी देशात जनगणना होते. त्यात लोकसंख्येसोबतच स्त्री, पुरुष, मुलांची संख्या, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्थिती लक्षात येते. समाज कुठे पोहोचला आहे आणि विकासासाठी काय करणे आवश्यक आहे, त्याचा अंदाज येतो. हेच तत्त्व पक्षीगणनेलाही लागू होते. शहरात वेगाने कमी होत जाणारे अधिवास पाहता आकाशात उडणाऱ्या या जिवांचे नेमके काय होते याचा अभ्यास करण्यासाठी गेली अकरा वर्षे पक्षीगणना केली जाते. पक्ष्यांची वास्तविक संख्या नोंदणे शक्य नाही. या गणनेत पक्ष्यांचे प्रकार मोजले जातात. पक्षी दिसत असल्याचे ठिकाण, गेल्या काही वर्षांत दिसणारे-दुर्मीळ झालेले पक्षी यावरून पर्यावरणाचा अंदाज लक्षात येतो. पर्यावरणतज्ज्ञांसोबतच सामान्यांनाही ही माहिती रोचक वाटते.

पक्षीगणना म्हणजे काय?
जनगणनेत माणसांची संख्या मोजली जाते. मात्र पक्षीगणनेत पक्ष्यांची संख्या नाही तर त्यांची विविधता पाहिली जाते. पक्षीगणनेत भाग घेणाऱ्या पक्षीमित्रांचा गट पहाटेपासून शहराच्या विविध भागांत पक्ष्यांची नोंद घेण्यास सुरुवात करतात. संध्याकाळपर्यंत नेमके किती पक्षी, कुठे दिसले त्याची नोंद होते. यावर्षी यात सुमारे ३०० जणांनी ५० हून अधिक गटांमध्ये पक्षीगणना केली. गेल्या दहा वर्षांतील पक्षीगणनेमुळे अनेक निरीक्षणे समोर आली, त्यामुळे मुंबई, ठाणे परिसरातील विविध अधिवासातील पक्ष्यांचे प्रकारही नोंदले गेले.
सुरुवातीची काही वर्षे सर्वाधिक पक्ष्यांच्या प्रकारांची नोंद करणाऱ्या गटाला बक्षीस दिले जात असे. मात्र या स्पर्धेत अभ्यासाचा भाग अधिक असल्याने मागच्या वर्षांपासून स्पर्धा बंद करण्यात आली.
अधिवासाचे प्रकार-शहरातील हिरवाई कमी होत चालल्याने पक्ष्यांची संख्या रोडावली आहे हे खरे. मात्र पक्षी केवळ झाडांवर राहतात असेही नाही. पक्ष्यांच्या अधिवासाचे प्रकार वेगवेगळे असतात. काही पक्षी पाणवठय़ाजवळ राहतात. चिखलात घरटी बांधून अंडी घालतात. काहींनी खाडीकिनाऱ्याजवळचे मासे व जीवजंतू खुणावत असल्याने ते किनारपट्टीच्या प्रदेशात आढळतात. काहींना गर्द झाडी आवडते. कोणाचीही चटकन नजर पडणार नाही आणि पडली तरी हिरव्या पानांमधून ते ओळखू येणार नाहीत, याची काळजी पक्षी घेतात. तर काही पक्ष्यांना माणसांच्या वस्तीजवळ राहणे त्रासदायक वाटत नाही. मुंबईत या सर्व प्रकारचे अधिवास आहेत आणि त्यामुळे येथील पक्ष्यांमध्ये विविधताही आहे. मात्र पाणवठे व गर्द झाडी कमी होत असल्याने मुंबईकरांना हे पक्षी पाहण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान किंवा कर्नाळा पक्षी अभयारण्यापर्यंत जावे लागते.
पक्षी दिसत असल्याचे टापू-कितीही प्रदूषित झाली तरी मुंबईची हवा
स्वच्छ करणारा समुद्र व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या शहराला लाभले आहेत. या दोन्ही ठिकाणी पक्ष्यांना निवासाची उत्तम सोय होते. राष्ट्रीय उद्यानासोबतच आरे कॉलनी, पवई, भांडुप पपिंग स्टेशन, मलबार हिल, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यान, कुलाबा येथील नेव्ही परिसर
या ठिकाणी तसेच शिवडी किनाऱ्यावर पक्षी पाहता येतात. याशिवाय मुंबईशेजारील वसई-विरार, कर्जत-कल्याण, कर्नाळा, उरण, अलिबाग, एलिफंटा या ठिकाणीही भरपूर पक्षी दिसतात.    ’

परदेशी पक्ष्यांची ठाणी..!
’ठाणे पूर्व विभागात मिठागर रोड खाडीलगत सध्या अनेक पक्षी दिसतात. डिसेंबरपासून हे पक्षी येऊ लागतात. इग्रेट, हेरॉन, स्टॉर्क, सॅण्ड पायपर आदी पक्षी मार्च महिन्यापर्यंत असतात.
’येऊरच्या डोंगरावर तिन्ही ऋतूंमध्ये निरनिराळ्या पक्ष्यांचे दर्शन होते. रॅकीट टेल, कुडकेपर, सनबर्ड आदी पक्षी आढळतात; मात्र त्यातही विशेष करून चोरोपीसचा उल्लेख करावा लागेल, कारण हा पक्षी केवळ येथेच येतो.
’डोंबिवलीजवळील निळजे येथील तलाव परिसरातही अनेक पक्षी दिसून येतात. त्यात पर्पल मूरहेन, जकाना, सँक आदी प्रकारचे पक्षी येथे दिसतात.
’ऐरोली खाडीपूल येथे फ्लेमिंगो दिसतात.
प्राजक्ता कासले

धोक्यात असलेले अधिवास
गवताळ, खुरटी झुडपे असलेल्या जागा वेगाने नष्ट होत आहेत. पाणथळ जागा, खाडीकिनाऱ्याच्या चिखलाच्या जागांवरही अतिक्रमण होत आहे. सिडको, जेएनपीटी आणि इतर संस्थांच्या पर्यावरणासंबंधी आत्यंतिक दुर्लक्षामुळे आणि चुकीच्या विकासयोजनांमुळे पाम बीच रोडवरील ६० टक्के पाणथळ जागा गेल्या काही वर्षांत बुजवल्या गेल्या आहेत. त्यामुळे अधिवासाच्या निवाऱ्याला पक्षी मुकले आहेत. – संजय मोंग, पक्षीतज्ज्ञ

वैशिष्टय़े
’ मुंबईतील पक्षीगणनेचे हे ११ वे वर्ष
’ देशभरातील १५ शहरांतून होत असलेल्या गणनेत ४००० पक्षीमित्र
’ मुंबईच्या पक्षीगणनेत ३२० सहभागी
’ गेल्या वर्षांपासून स्पर्धात्मक गणना बंद
’ पहाटेपासून संध्याकाळपर्यंत मुंबई व परिसरातील ६० किलोमीटरचा प्रवास करून पक्ष्यांची नोंद
’ वाढत्या शहरीकरणात पक्ष्यांच्या अधिवासात काही बदल होतो आहे का, हे पाहण्यासोबतच जैवविविधता व पक्षी निरीक्षणासंबंधी जागृती करण्याचा हेतू.
’ मुंबईत वर्षभरात साधारण ३५० विविध प्रकारचे पक्षी दिसतात. या ऋतूत स्थानिक पक्ष्यांसोबतच अनेक स्थलांतरित पक्षी दिसतात. वसंताची पानगळ सुरू झाल्याने पक्षी दिसण्यास सुयोग्य ऋतू आहे.

पक्ष्यांच्या दिसलेल्या जाती
२००५    – २७७
२००६    – २८३
२००७    – २५२
२००८     – २६१
२००९    – २६३
२०१०     – २५०
२०११     – २४८
२०१२     – २४२
२०१३     – २४९
२०१४     – २२५
२०१५     – २११