सायबर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांचा उपक्रम
ठाणे : सायबर गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने नागरिकांना सायबर गुन्ह्यांबाबत माहिती व्हावी यासाठी सायबर गुन्हे जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. ठाणे शहर पोलिसांच्या ट्विटर आणि फेसबुक या समाजमाध्यमांवर सायबर गुन्ह्यांपासून कसे वाचावे, फसवणूक झाल्यास पोलिसांशी कसा संपर्क साधावा तसेच सायबर गुन्ह्यांबाबतचे कायदे, समाजमाध्यमांतून होणारे लैंगिक छळ, ऑनलाइन व्यवहारात होणारी फसवणूक आणि त्यापासून बचाव यासर्व गोष्टींची माहिती नागरिकांना माहितीपत्रकांद्वारे दिली जात आहे.
सर्वसामान्य नागरिकांचा आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत ऑनलाइन व्यवहार पद्धतीकडे कल दिसून येतो. असे व्यवहार करताना अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. तसेच काही नागरिक जास्त पैसे मिळविण्याच्या किंवा कमविण्याच्या अमिषाला बळी पडतात आणि आपल्या बँक खात्याविषयीची सर्व गोपनीय माहितीची देवाणघेवाण करतात. याचाच फायदा घेत काही भामट्यांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते. तसेच तरुण-तरुणी आपल्या खासगी आयुष्याची माहिती, छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकण्याच्या बाबतीत आहारी गेल्याचे दिसून येते. याच खासगी माहितीचा आणि छायाचित्रांचा गैरवापर करून त्यांच्याकडून काही समाजकंटक पैसे उकळतात. या प्रकारच्या गुन्ह्यांबाबत कुठे तक्रार करावी, सायबर गुन्हे शाखेशी कसा संपर्क साधावा तसेच सायबरक्राईम या संकेत स्थळाला भेट देणे याबाबत नागरिकांना माहिती व्हावी यासाठी हे सायबर गुन्हे जनजागृती अभियान राबविले जात आहे.
माहितीपत्रकांद्वारे जनजागृती
सायबर गुन्ह्यांच्या प्रकाराबाबत माहिती, आपली फसवणूक कशी होऊ शकते, मुलांच्या हातात मोबाइल दिल्यावर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, नोकरीबाबतचे खोटे संदेश ओळखणे, महिलांचे लैंगिक छळ करण्यासाठी गुन्हेगार कोणती प्रणाली वापरतात याबाबत माहिती. तसेच सध्या अनेकांचे करोनाच्या पाश्र्ववभूमीवर घरून काम सुरू आहे. अशा वेळेस सुरक्षित इंटरनेटचा वापर करावा, ईमेल खाते आपल्याच संगणकावर सुरू करावे याबाबत सायबर गुन्हे अन्वेषण शाखेकडून जनजागृती केली जात आहे.
सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर फार प्रभावी ठरतो. सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी आणि नागरिकांनी आपली फसवणूक होऊ नये यासाठी कसे सतर्क रहावे, या हेतून हे जनजागृती अभियान राबविले जात आहे. – सरदार पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण शाखा, ठाणे