कल्याण : बदलापूर रेल्वे स्थानकात एका प्रवाशाच्या पिशवीतून सोन्याचा एक लाख ४६ हजार रुपयांचा किमती ऐवज चोरुन फरार झालेल्या एका चोऱट्याला कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवलीतून अटक केली. त्याच्याकडून चोरीचा एक लाख ४० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनिल श्रीधर मासवकर (५१, रा. बदलापूर) असे चोरट्याचे नाव आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात एक प्रवासी गेल्या आठवड्यात रात्रीच्या वेळेत लोकलची वाट पाहत बसला होता. कामाच्या थकव्यामुळे त्याला बाकड्यावर डुलकी लागली. या प्रवाशाजवळ एक पिशवी होती. पिशवीत सोन्याची साखळी, मोबाईल, अंगठी, २९ हजाराच्या नोटा होत्या. आरोपी अनिलने प्रवासी गाढ झोपेत असल्याचे पाहून त्याच्या जवळील पिशवी हळूच बाजुला घेऊन त्यामधील सोन्याचा किमती ऐवज घेऊन पसार झाला.

हेही वाचा >>> ठाणे पालिकेसमोर दोन्ही काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन, महेश आहेर यांना निलंबित करण्याची मागणी

प्रवाशाला जाग आल्यावर त्याने पिशवी पाहिली तर त्यात काहीही नव्हते. त्याने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अरशुद्दिन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश चौगुले, हवालदार राजेंद्र दिवटे, जनार्दन पुळेकर, रणजित रासकर, रवींद्र दरेकर, वैभव जाधव, स्मिता वसावे, महेंद्र कार्डिले, रवींद्र ठाकूर, सोनाली पाटील, अजित माने, अजीम इनामदार, सुनील मागाडे, अक्षय चव्हाण, गोरख सुरवसे यांच्या पथकाने बदलापूर ते डोंबिवली परिसरातील रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यांना आरोपी अनिल डोंबिवली परिसरात असल्याचे तांत्रिक माहितीवरुन दिसून आले. तो दडून बसला असल्याच्या ठिकाणाहून पथकाने आरोपी अनिलला अटक केली. त्याच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डाॅ. रवींद्र शिसवे, उपायुक्त मनोज पाटील, साहाय्यक आयुक्त सचिन कदम यांनी पथकाला मार्गदर्शन केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur railway station thief arrested from dombivli ysh