अंबरनाथ: गेल्या २५ वर्षांपासून वास्तव्य असूनही साधे पथदिवे, गटार यासारख्या नागरी सुविधा भटक्या विमुक्त वस्तीला मिळाल्या नाहीत. याविरुद्ध नाथपंथी डबरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थेच्या वतीने अंबरनाथ पालिकेवर मोर्चा नेण्यात आला. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या पोतराजांनी अंगावर आसुडाचे फटके मारत नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. संघटनेच्या शिष्टमंडळाने पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर येत्या सात दिवसाचा सुविधा देण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिली आहे.
अंबरनाथ शहरात विविध समाजाच्या बांधव गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य आहेत अंबरनाथ नगरपालिका मुख्यालयाच्या अगदी मागे सरकस मैदानाशेजारी भटक्या विमुक्त समाजातील बांधवांची मोठी वसाहत आहे. या वसाहतीमध्ये नाथपंथी, डबरी, वडार, गोसावी, बंजारा, कैकाडी, बहुरूपी आदी भटक्या, विमुक्त जमातीच्या बांधवांचे वास्तव्य आहे. मात्र या वस्तीमध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे. पथदिवे सांडपाणी वाहून नेण्यासाठी कटार या प्राथमिक सोयी सुविधांचाही या वस्तीमध्ये अभाव दिसून येतो विविध संघटनेच्या वतीने या मागण्यांसाठी सातत्याने पालिका प्रशासनाकडे अर्ज विनंती केली जाते मात्र त्यात यश येताना दिसत नाही.
येथील रहिवाशांना नागरी सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. या सुविधा मिळण्यासाठी नाथपंथी, डबरी, गोसावी, भटके विमुक्त सेवा संस्थेचे अध्यक्ष भीमराव इंगोले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी अंबरनाथ नगरपालिका कार्यालयावर पारंपरिक वेशात मोर्चा काढण्यात आला. गोंधळी, पोतराज, संबळ, वादक, बहुरूपी अशा सर्वांनी आपल्या कला सादर करत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. पोतराज स्वतःच्या अंगावर आसूड ओढून घेत संताप व्यक्त करत होते. यावेळी भटके विमुक्त बांधव सहकुटुंब उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष इंगोले यांच्यासह कामगार नेते श्याम गायकवाड, कमलाकर सूर्यवंशी, कैलास भांडलकर , राहुल हंडोरे, सुंदर डांगे, मंगेश सोळंकी यांच्या शिष्टमंडळाने अंबरनाथ नगरपालिकेचे उप मुख्याधिकारी उमेश राऊत यांची भेट घेतली. यावेळी येथील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवेदन देण्यात आले. सर्कस मैदानात असलेल्या नागरी सुविधा पुरवण्याबाबत प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत, येत्या काही दिवसात नागरी सुविधा देण्यात येतील असे आश्वासन उप मुख्याधिकारी उमेश राऊत यांनी शिष्टमंडळाला दिले.
मागण्या काय
सर्कस मैदान परिसरात नाथपंथी, डबरी, वडार, गोसावी, बंजारा, कैकाडी, बहुरूपी अश्या भटक्या विमुक्त जातीचे ५३० कुटुंबे गेल्या २५ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. वस्तीतील सर्वांना हक्काचे घर मिळावे म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. सर्व कुटुंबाचे परिसरात पुनर्वसन करावे, त्यांना घरपट्टी लागू करण्यात यावी, पिण्याचे पाणी मिळावे, हक्काचा निवारा मिळावा अशा संस्थेच्या मागण्या आहेत.