ठाणे : भिवंडी येथे कंत्राटदाराच्या देयकाची रक्कम पूर्ण देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या बोरीवली (पडघा) ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी विद्या बनसोडे (४६) यांना सोमवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांनी पडघा येथील बोरीवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम घेतले होते. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामविकास अधिकारी विद्या बनसोडे यांनी तक्रारदार यांच्याकडून मंजूर देयकाची सर्व रक्कम हवी असल्यास देयकाच्या तीन टक्के प्रमाणे ३० हजार रुपयांची मागणी केली. यानंतर तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सापळा रचून बनसोडे यांना लाचेप्रकरणी ताब्यात घेतले. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात बनसोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.