ठाणे : येथील पाचपाखाडी भागातील एका सोसायटीमध्ये मांजर शिरली होती. सोसायटीच्या सुरक्षारक्षक तिला हुसकावून लावत असताना त्याच्या काठीचा फटका मांजरीला बसला आणि त्यात मांजरीचा जागीच मृत्यू झाला. ठाण्यातील पाचपखाडी भागात बुधवारी हा प्रकार घडला असून सोसायटीमधील काही नागरिकांनी शनिवारी हे प्रकऱण उघडकीस आणले.

ठाण्यातील पाचपाखाडी भागातील एक सोसायटी आहे. या सोसायटीत मांजरींचा वावर वाढला आहे. सोसायटीच्या आवारात या मांजरी शिरतात. यामुळेच सोसायटीने मांजरींबाबत एक नियमावली तयार केली आहे. मांजरींचा सोसायटीत शिरकाव होऊ नये म्हणून ही नियमावली तयार करण्यात आली असून तिचे पालन सुरक्षारक्षकांना करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मांजरींचा सोसायटीमधील प्रवेश रोखण्यासाठी जिन्यालगत लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. यानंतरही मांजर सोसायटीत शिरली तर, तिला हुसकरण्याचे काम सुरक्षारक्षकाला सोसायटी नियमानुसार करावे लागते. याच परिसरात जुली नावाच्या मांजरीचा वावर होता. ही मांजर गर्भवती होती.

सोसायटीतील अनेक प्राणीप्रेमी तिला खाण्यास घालत असत. अशातच बुधवारी सायंकाळी सात ते आठ च्या सुमारास ही मांजर सोसायटीच्या आत शिरली. नियमानुसार तिला बाहेर काढण्यासाठी सुरक्षारक्षक गेला. त्याने जिन्याचा लोखंडी गेट कापडाने बंद केला. हातात काठी घेऊन तो लिफ्टने वर गेला. त्या काठीच्या साहाय्याने तो मांजरीला हुसकावून लावत होता. मांजर बाहेर येण्यासाठी धडपड करू लागली. गेट बंद असल्याने तिला बाहेर येता येत नव्हते. तिला हुसकवत लावत असताना सुरक्षारक्षकाने मांजरीला काठीने फटका मारला. हा फटका जोरात बसला आणि त्यात मांजरीचा मृत्यु झाला. सोसायटीतील प्राणीप्रेमींनी या घटनेबाबत सुरक्षारक्षकाला विचारणा केली. त्यानंतर सोसायटीचे सिसिटिव्ही कॅमेरा चित्रीकरण तपासले असता, हा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती सोसायटीमधील रहिवाशी ॲड. अजित पितळे यांनी दिली. या मांजरीला पशुवैद्यक डॉक्टरांकडे नेले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी मांजरीबरोबरच तिच्या पोटातील पिलांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले, असेही त्यांनी सांगितले.

मांजरीबाबत सोसायटीचे नियम काय ?

या सोसायटीजवळ अनेक मांजरींचा वावर असायचा. यातील कोणतीही मांजर आत येऊ नये म्हणुन सोसायटीने काही नियम आखले होते. यामध्ये मांजर आत शिरू नये म्हणुन जाळी लावण्यात आली आहे. तसेच मांजर आत शिरल्यास सुरक्षारक्षकाने तिला बाहेर काढावे अशा सुचना आहेत, असे पितळे यांनी सांगितले.