डोंबिवली – शिवसेना, भाजपाच्या डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील दहीहंडी कार्यक्रमांमुळे डोंबिवली पूर्व भागातील बाजीप्रभू चौक, पश्चिमेतील पंडित दिनदयाळ रस्त्यावरील वाहतुकीत ६ सप्टेंबर रोजी रात्री १२ ते ७ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बदल करण्यात आले आहेत. डोंबिवली वाहतूक विभागाने ही रस्ते बदलाची अधिसूचना सोमवारी जाहीर केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली पूर्वेत भाजपातर्फे बाजीप्रभू चौकात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी ६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते ७ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत फडके रस्त्यावरुन बाजीप्रभू चौक येथे येणारी वाहतूक बंद करण्यात येत आहे. ही वाहतूक फडके रस्त्यावरुन डावे वळण घेऊन फत्तेह अली रस्त्यावरुन पालिका डोंबिवली विभागीय कार्यालय येथून वळविण्यात आली आहे.

हेही वाचा – कल्याण-डोंबिवली महापालिकेची गतिमान ई ऑफिस प्रणाली संथगतीने

हेही वाचा – ठाणे : शिधापत्रिकाविषयक समस्या महिन्याभरात मार्गी लावा, आमदार संजय केळकर यांच्या शिधावाटप अधिकाऱ्यांना निर्देश

डोंबिवली पश्चिमेत पंडित दिनदयाळ रस्त्यावर सम्राट चौक येथे माजी सभापती दीपेश म्हात्रे फाऊंडेशनतर्फे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागातून मोठागाव, जुनी डोंबिवली, रेतीबंदर, देवीचापाडा भागात जाणारी वाहतूक दिनदयाळ रस्त्यावरील गणपती मंदिरासमोर डावे वळण घेऊन जी. एन. गॅरेज, एलोरा सोसायटीमार्गे सम्राट चौकाच्या पाठीमागील बाजूने इच्छितस्थळी जातील. दिनदयाळ रस्त्याने जाण्यासाठी ठाकूरवाडी, रेतीबंदर, देवीचापाडा, उमेशनगर, आनंदनगर भागातून येणाऱ्या वाहनांना हाॅटेल सम्राट चौक येथे रस्ता बंद करण्यात येणार आहे. ही वाहने सम्राट चौक येथे डावे वळण घेऊन नाना शंकर शेठ मार्गे घनश्याम गुप्ते रस्ता मार्गे इच्छित स्थळी जातील, असे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in road traffic in dombivli due to shiv sena bjp dahihandi program ssb