र्मचट नेव्ही प्रशिक्षित बेरोजगारांना तेलवाहू जहाजांवर मोठय़ा पगाराच्या नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीतील तिघांना ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे. या टोळीकडून अशा प्रकारे फसवणूक झालेला एक भारतात परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या टोळीने अशा प्रकारे आणखी तरुणांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात असून त्यासंबंधीचा तपास पोलीस करीत आहेत.

नाशिक जिल्ह्य़ातील पंचवटी भागात भूषण जाधव राहत असून त्याने नवी मुंबईत डिप्लोमा इन नॉटिकल सायन्सचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नोकरीच्या शोधात असताना एका ओळखीतील व्यक्तीच्या मदतीने तो आखाती देशात नोकरी लावणाऱ्या धीरजकुमार ऊर्फ मनोज सिंग याच्या संपर्कात आला. धीरजने त्याची ओळख ठाणे पूर्वेतील मातोश्री शिप मॅनेजमेंट प्राव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक शशिभूषण सिंग व सूर्यप्रकाश कृपासिंधू तिवारी यांच्याशी करून दिली. या दोघांनी प्रतिमहा ६०० यू.एस.डॉलर इतक्या पगाराची दुबईमधील तेलवाहू जहाजावर नोकरी देण्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी त्याच्याकडून साडेतीन लाख रुपये घेतले. चांगल्या पगाराची नोकरी मिळणार असल्यामुळे त्याच्या वडिलांनी जमीन विकून तसेच उसणवारी पैसे घेऊन साडेतीन लाख रुपये जमा केले होते. जुलै महिन्यात तो नोकरीवर रुजू होणार होता, पंरतु अचानकपणे त्याला इराणला पाठविण्यात आले. इराणमधील बुशेर शहरातील एका खोलीत त्याला काही भारतीयांसोबत महिनाभर कोंडून ठेवण्यात आले. महिनाभर निकृष्ट जेवण देऊन छळ केल्यानंतर त्याला मासेमारीच्या जहाजावर नोकरी देण्यात आली.

नाइलाजास्तव त्याने सहा महिने नोकरी केल्यानंतर त्याला पूर्ण पगारही देण्यात आला नाही. तिथेही शीवीगाळ, धमकी देणे आणि जेवण न देणे, असे प्रकार सुरू होते. या छळाला कंटाळून फेब्रुवारी महिन्यात तेथून पळ काढत तो भारतात परतला. या सर्व प्रकाराचा त्याला मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरल्यानंतर त्याने ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि या गुन्ह्य़ाचा तपास ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्यात आला. या विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.आर. दौंडकर यांच्या पथकाने आरोपींचा माग काढत याप्रकरणी शशिभूषण, धीरजकुमार आणि कैलास कोरडे या तिघांना अटक केली आहे.