ठाणे – दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यानिमित्त नागरिकांची दिवाळी खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. कंदिल, पणत्या, घर सजावटीचे साहित्य, तोरण, विद्यूत रोषणाईच्या माळा, रांगोळी, कपडे,फराळाचे साहित्य असे विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी रविवारी बाजारात गर्दी केली होती. ठाणे शहरातील राममारूती रोड, जांभळी नाका, गोखले रोड, गावदेवी परिसर या शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. यापैकी जांभळी नाका बाजारपेठ ही मुख्य बाजारपेठ मानली जाते.

 याठिकाणी धान्यांपासून ते अगदी कपड्यांपर्यंत सर्वच साहित्य उपलब्ध होते. तसेच याबाजारात बऱ्यापैकी व्यापारी वर्ग हा होलसेल विक्रेता असल्या कारणाने ग्राहक याठिकाणी येऊन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. दिवाळीनिमित्त बाजाराला नवचैतन्याचे रुप प्राप्त झाले आहे. विद्यूत रोषणाईने उजळलेल्या या बाजारपेठांमुळे नागरिकांमध्ये खरेदीचा वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. इलेक्ट्राॅनिक वस्तू, सोनं, कपडे, मिठाई, आकाश कंदील, विद्यूत माळा, पणत्या, रांगोळी या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

ठाणे शहरातील राम मारुती रोड, गोखले रोड, नौपाडा या मार्गांवर करण्यात आलेल्या विद्यूत रोषणाईमुळे शहराला वेगळेच रुप प्राप्त झाले आहे. गोखले रोडवरील काही दुकानांमध्ये ग्राहकांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले जात आहे. तसेच दिवाळीनिमित्त विविध सवलती देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्येही खरेदीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळीला अवघा आठवडा शिल्लक राहिल्यामुळे नागरिकांची बाजारात खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. ठाण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जांभळी नाका बाजारपेठेत रविवारी सकाळपासून नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.