परदेशी कंपन्यांची फसवणूक केल्याने चौघांना अटक

ठाणे : अमेरिका आणि कॅनडातील कंपन्यांनी भारतीय कंपन्यांकडे सुमारे अडीच कोटी रुपयांच्या चादरींची (बेडशीट) मागणी केली होती. मात्र या परदेशी कंपन्यांना चादरींऐवजी दगड पाठविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मालवाहतूकदार कंपन्यांत काम करणाऱ्या चौघांना भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. सर्फराज अन्सारी (४५), मोहम्मद फारूक कुरेशी (४६), मोहम्मद रिहान कुरेशी (२९) आणि मोहम्मद मुल्तजीम कुरेशी (३०) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून १ कोटी ९२ लाख ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांनी दिली.

भिवंडी येथील काल्हेर भागात एनएमके टेक्सटाइल मिल्स आणि ग्लोब कॉटर्यान नावाच्या कंपन्यांची गोदामे आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी एनएमके टेक्सटाइल मिल्स या कंपनीकडे शिकागो आणि कॅनडा येथील दोन कंपन्यांनी १ कोटी २६ लाख ९९ हजार ८०९ रुपयांच्या चादरींची मागणी केली होती. त्यानुसार कंपनीने दोन मालवाहतूकदार कंपन्यांच्या कंटेनरमधून जहाजामार्फत चादरी पाठविल्या. त्यानंतर ग्लोब कॉटर्यान या कंपनीकडेही अमेरिकेतील एका कंपनीने १ कोटी १५ लाख रुपयांच्या चादरीची मागणी केली होती. या कंपनीनेही याच मालवाहतूकदार कंपन्यांद्वारे चादरी पाठविल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी या चादरी परदेशात पोहचल्यानंतर तेथील कंपनीने तपासणी केली. त्यावेळी चादरींऐवजी त्यांना दगड आढळून आले. त्यानंतर या परदेशी कंपन्यांनी याची माहिती एनएमके टेक्सटाइल मिल्स आणि ग्लोब कॉटर्यान कंपनीला दिली. त्यानुसार दोन्ही कंपनी मालकांनी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, यातील आरोपी हे मालवाहतूकदार कंपनीतील चालक असल्याची माहिती भिवंडी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथके तयार करून चौघांना अटक केली. त्यांनी वसई येथे लपविलेल्या १ कोटी ९२ लाख ८७० रुपयांच्या चादरी जप्त केल्या आहेत.