सोमय्या, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात तफावत
निवासी भागातील मिलापनगर तलावातील मासे मृत अवस्थेत आढळून आले होते. डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने याविषयी आवाज उठविल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व सोमय्या महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले होते. या दोघांच्या अहवालात तफावत आढळून आल्याने या अहवालाविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून मासे मृत झाल्याचे खरे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे.
डोंबिवली शहरातील निवासी भागातील मिलापनगरमध्ये हा तलाव आहे. यंदा गणेशोत्सवानंतर येथील मासे नागरिकांना मृत अवस्थेत आढळून आले. त्यामुळे मिलापनगरवासीयांनी या पाण्याची तपासणी करण्यात यावी, असे निवेदन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास दिले होते. यामुळे मंडळाबरोबर सोमय्या महाविद्यालयाच्या पर्यावरण प्रयोगशाळेनेही येथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले. सोमय्या प्रयोगशाळेच्या अहवालानुसार येथील पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण शून्य असल्याने मासे मृत झाले. प्रदूषण मंडळाच्या अहवालात मात्र तलावातील पाण्यात ३.२ मिलिग्रॅम प्रतिलिटर इतका ऑक्सिजन असल्याने मासे मरणे अशक्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

प्रदूषण मंडळाने अहवालात पाण्यात ऑक्सिजन असल्याचे नमूद केले आहे, परंतु मासे कशाने मेले हे स्पष्ट केलेले नाही. ते त्यांनी स्पष्ट करावे तसेच डोंबिवलीतील सर्व तलाव व विहिरी यांचे पाण्याचे नमुने योग्य पद्धतीने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे व त्याचा अहवाल पालिका व आम्हाला द्यावा, ही विनंती आहे.– राजू नलावडे, वेल्फेअर सोसायटी