ठाणे : ठाण्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध मे. जोशी एंटरप्रायझेसचे बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके आणि त्यांच्या भागीदारांविरोधात पूनर्विकास प्रकल्पामध्ये फसवणूक केल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे कळके आणि त्याच्या भागीदारांवर दाखल गुन्ह्यांची संख्या आठ झाली आहे. खारकरआळी आणि चरई भागातील गृहसंकुलाच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कळके आणि त्याच्या भागिदारांनी इमारतीचा पूनर्विकास करून देतो असे सांगून फसवणूक केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. मे. जोशी एंटरप्रायझेसच्या माध्यमातून कळके आणि त्याच्या भागीदारांनी ठाणे स्थानक परिसर, नौपाडा, चरई, पाचपाखाडी या जुन्या ठाण्यातील इमारतींचे पूनर्विकास प्रकल्प हाती घेतले होते. त्यामुळे आणखी काही तक्रारी पुढे येण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कौस्तुभ कळके आणि त्याच्या भागीदारांनी मे. जोशी एंटरप्रायजेस या नावाने बांधकाम कंपनी सुरू केली होती. या कंपनीच्या माध्यमातून कळके यांनी ठाणे स्थानक परिसर, नौपाडा, चरई आणि पाचपाखाडी भागातील जुन्या तसेच मोडकळीस आलेल्या अनेक इमारतींची पुनर्विकासाची कामे घेतली होती. परंतु भागीदारीमध्ये वाद निर्माण झाल्याने प्रकल्प अडचणीत आले. कौस्तुभ कळके याने दोन भागीदारांना बाहेर काढण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून ती बँक आणि कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करून फसवणूक केल्याचा आरोप कंपनीचे भागीदार सुनील लिमये यांनी केला होता. लिमये याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कौस्तुभ कळके याला अटक केली होती. त्यानंतर पूनर्विकास रखडलेल्या गृहसंकुलाच्या सभासदांनी कौस्तुभ कळके आणि त्याच्या भागीदारांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी देण्यास सुरूवात केली. या प्रकरणांचा तपास ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. कळके याच्यासह त्याचे भागीदार जयंती जैन, सुनील लिमये, कमिशा सिंह आणि सुंदरराज हेगडे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा – कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा

हेही वाचा – ऑलिम्पिकमध्ये झळकण्यासाठी क्रीडासंकुलांची गरज, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांचे प्रतिपादन

आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने काही दिवसांपूर्वीच नागरिकांना कळके आणि त्याच्या भागीदारांविरोधात तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, खारकरआळी आणि चरई येथील गृहसंकुलातील पदाधिकाऱ्यांनी कळके विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. पूनर्विकास करून देतो असे सांगून त्याने पूनर्विकासाची कामे हाती घेतली होती. परंतु ही कामे ठप्प आहेत. तसेच मासिक भाडेही त्याने इमारतीतील रहिवाशांना देणे बंद केले आहे. कळके आणि त्याच्या भागीदारांविरोधात आतापर्यंत फसवणुकीचे आठ गुन्हे दाखल झाले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction businessman kaustubh kalke problems increase two more offenses related to fraud in redevelopment projects ssb