करोना काळजी केंद्रात उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण कमी

ठाणे : जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही करोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. मात्र, शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही रुग्णांचे उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. ग्रामीण भागात सद्यस्थितीला २,८१७ रुग्णांवर करोनाचे उपचार सुरू असून यापैकी केवळ ९ रुग्ण उपचारासाठी करोना काळजी केंद्रात दाखल असल्याची माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली. सध्या आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्यामुळे हे रुग्ण गृहविलगीकरणात राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत.

करोना विषाणू तसेच करोनाच्या उत्परिवर्तीत ओमायक्रॉन या विषाणूचे रुग्ण मोठय़ासंख्येने आढळून येत आहेत. रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण जरी मोठे असले तरी या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रमीण भागातही सद्यस्थितीला करोना रुग्ण मोठय़ाप्रमाणात आढळून येत आहेत. ग्रमीण भागात सध्या दिवसाला ४०० ते ४५० रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागात करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मागील आठवडय़ापासून प्रत्येक तालुक्यात करोना काळजी केंद्र पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. मात्र, सध्या आढळून येत असलेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे हे रुग्ण गृहविलगीकरणात राहूनच उपचार घेत आहेत. तर, ज्या रुग्णांना अधिक लक्षणे आहेत किंवा ज्यांना गृहविलगीकरणात राहणे शक्य नाही असे रुग्ण सध्या करोना केंद्रात उपचारासाठी दाखल होत आहेत.

सद्यस्थितीला ग्रामीण भागात २,८१७ सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये शहापूर तालुक्यातील २९२ रुग्णांचा समावेश असून यापैका ९ रुग्णांवर गोठेघर येथील करोना काळजी केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तर, ग्रामीण भागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

ग्रामीण भागातील उपचारधीन रुग्ण

तालुका                उपचारधीन रुग्ण                          

कल्याण                     १६०१                                                               

भिवंडी                         ६६१                                                                     

 शहापुर                       २९२                                                                  

अंबरनाथ                     १८८                                                                   

 मुरबाड                        ७५                                                                  

 एकूण                       २,८१७

ग्रामीण भागातही मागील काही दिवसांपासून मोठय़ासंख्येने रुग्ण आढळून येत आहेत. परंतु, यापैकी अनेक रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे हे रुग्ण गृहविलगीकरणात राहून उपचार घेत आहेत.

-डॉ. भाऊसाहेब दांगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषद