सौम्य लक्षणांमुळे घरातच उपचार घेण्याकडे कल
ठाणे : जिल्ह्यात ओमायक्रॉन तसेच करोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून दिवसाला दीड हजारहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. असे असले तरी या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्यामुळे बहुतांश रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण २० हजार ३२६ खाटांपैकी केवळ १ हजार ३५३ खाटा रुग्णांनी व्यापल्या आहेत. यामध्ये ११७ रुग्ण अतिदक्षता विभागात, तर ४७३ रुग्ण हे प्राणवायू असलेल्या खाटांवर आणि इतर सामान्य खाटांवर उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. जिल्ह्यात सर्व रुग्णालये, प्राणवायूची व्यवस्था, खाटांची उपलब्धता यासाठी काटेकोरपणे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. करोना संसर्ग कमी व्हावा यासाठी करोनाबाधित आढळून येत असलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील २० ते २५ जणांचीही तात्काळ करोना चाचणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या दिवसाला २६ हजार ३८६ करोना चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये आढळून येत असलेल्या करोनाबाधितांमध्ये लक्षणे असलेले तसेच गृह विलगीकरण शक्य नसलेले रुग्ण सध्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालय यंत्रणेवर अद्याप या लाटेचा भार वाढलेला नाही. जिल्ह्यातील २० हजार ३२६ खाटांपैकी १ हजार ३५३ खाटा करोनाबाधित रुग्णांनी व्यापल्या आहेत. म्हणजेच केवळ सात टक्के रुग्णच रुग्णालयात उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात दिवसाला आढळून येणाऱ्या रुग्णांपैकी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण हे ३५ टक्के आहे. जिल्ह्यात सध्या ७ हजार ७३० सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये १६ टक्के रुग्ण हे करोना रुग्णालयात, ३४ टक्के रुग्ण हे करोना आरोग्य केंद्रात आणि ५० टक्के करोना काळजी केंद्रात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
सध्या आढळून येत असलेल्या करोनाबाधितांमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अनेक जण गृह विलगीकरण होत आहेत. ज्यांना गृह विलगीकरण शक्य नाही आणि ज्यांना लक्षणे जास्त आहेत ते रुग्णच सध्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होत आहे. – डॉ. अशोक कांबळे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे</p>
११७ रुग्ण अतिदक्षता विभागात
जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १ हजार ३५३ करोना रुग्णांपैकी ११७ रुग्ण अतिदक्षता विभागात, तर ४७३ रुग्ण हे प्राणवायू असलेल्या खाटांवर आणि इतर सामान्य खाटांवर उपचार घेत आहेत.