नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा

परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामटय़ांना भाईंदर पोलिसांनी तब्बल दीड वर्षांच्या शोधानंतर गजाआड केले आहे. मात्र या प्रकरणातला मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

जलालुद्दीन शेख व त्याच्या सहकाऱ्यांनी भाईंदर पश्चिम येथील बेकरी गल्ली परिसरात गेल्या वर्षी ओरीया फेम सोल्यूशन्स या नावाने कार्यालय थाटले होते. विविध वृत्तपत्रांत कुवेत, सायप्रस, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया आदी देशांत नोकरीची संधी असल्याची जाहिरात त्यांनी दिली. या जाहिराती पाहून गोवा, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील अनेक बेरोजगार तरुणांनी शेख याच्या कार्यालयात धाव घेतली. या तरुणांच्या रीतसर मुलाखती घेण्यात आल्या, त्यांची मीरा रोड येथे वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली. नोकरी हवी असेल तर प्रत्येकी ६८ हजार रुपयांची रक्कम जमा करण्याचे या तरुणांना सांगण्यात आले. काहींनी धनादेशाद्वारे तर काहींनी रोख स्वरूपात ही रक्कम शेख याच्या कार्यालयात जमा केली.

त्यानंतर तरुणांना कुवेतमध्ये फर्स्ट कुवेत जनरल ट्रेडिंग कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीत नोकरी मिळाल्याचे आणि महिना ४० हजार रुपये पगार असल्याचे सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर कुवेतला जाण्यासाठीचा व्हिसा, विमानाचे तिकीटदेखील त्यांना सुपूर्द करण्यात आले. सुरुवातीला देण्यात आलेले तिकीट आयत्या वेळी रद्द करण्यात आल्याचे तरुणांना सांगण्यात आले. नंतर मात्र तिकिटासाठी वेगवेगळ्या तारखा त्यांना देण्यात येऊ लागल्या. अखेर तिकीट नक्की झाल्याचे तरुणांना सांगण्यात येऊन आपले सामान घेऊन कार्यालयात बोलाविण्यात आले. त्यानुसार गेल्या वर्षी ५ फेब्रुवारीला सर्वजण भाईंदरच्या ओरिया फेमच्या कार्यालयाबाहेर जमा झाले. परंतु कार्यालयाला कुलूप पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कार्यालय गाठण्याआधीपासून शेख व त्याच्या सहकाऱ्यांनी आपले दूरध्वनीदेखील बंद करून ठेवल्याचे आढळून येत असल्याने तरुणांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होतीच. फसवले गेलेल्या तरुणांनी तपास केला असता त्यांचा व्हिसा आणि सुरुवातीला दिलेले तिकीटही बोगस असल्याचे स्पष्ट झाले.

अशा प्रकारे फसवणूक झालेल्या एकंदर २६ जणांनी भाईंदर पोलीस ठाण्यात शेख आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस आरोपींच्या मागावर होते. मात्र ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेर आरोपींपैकी मुंबईत राहणारा सैफुद्दीन अब्दुल वाजीद शेख ऊर्फ कुंडु आणि मीरा रोड येथे राहणारा मन्सुर अब्दुल सत्तार मुन्शी हे जलालुद्दीनचे सहकारी आपल्या घरी आले असल्याची माहिती पोलिसांना आपल्या सूत्रांकडून मिळाली आणि या दोघांची धरपकड करण्यात आली, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण यांनी दिली.