अंतर्गत वादामुळे तोळामासा अवस्था झालेल्या ठाण्यातील काँग्रेस पक्षात सोमवारी महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीवरून मतभेदांचा नवा अध्याय पाहावयास मिळाला. विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निरंजन डावखरे यांना पाठिंबा जाहीर करणारे माजी नगरसेवक रवी राव यांनाच काँग्रेसने स्वीकृत नगरसेवकपदासाठी निवडल्याने पक्षातील काही ज्येष्ठ नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सामूहिक राजीनामे पाठवले आहेत.
ठाणे महापालिकेत पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड मंगळवारी होत असून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा एक सदस्य नगरसेवक म्हणून नियुक्त होणार आहे. शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असलेले तसेच सामाजिक संघटनेच्या माध्यमातून प्रश्नांची जाण असलेले सदस्य नगरसेवक व्हावेत असे अपेक्षित असते. मात्र, राजकीय पक्षांकडून आपल्या कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी या नियुक्तीचा आधार घेतला जातो.
काँग्रेस पक्षाने आपल्या कोटय़ातून निवडून येणाऱ्या एका जागेसाठी रवी राव या माजी नगरसेवकाचे नाव जाहीर करताच सायंकाळी उशिरा काँग्रेस पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार निरंजन यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला होता, असा आरोप  करत ज्येष्ठ नगरसेवक आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार नारायण पवार यांनी राव यांच्या नियुक्तीला जाहीर विरोध केला. तसेच ही नियुक्ती कायम ठेवत असाल तर आपण नगरसेवकपदाचा राजीनामा देत असल्याचे पत्रही त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना धाडले. पक्षाविरोधात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी नगरसेवकपद बहाल केले जात आहे, असा आरोपही पवार यांनी केला आहे. दरम्यान, निरंजन डावखरे यांना पाठिंबा जाहीर केला नव्हता, असा खुलासा रवी राव यांनी केला. मी पक्षाचा प्रामाणिक सदस्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.