Diva garbage finally closed Bhandarli Garbage Project start Abhijeet Bangar thane ysh 95 | Loksatta

दिवा कचराभुमी अखेर बंद

तात्पुरत्या स्वरुपात उभारलेला भंडार्ली कचरा प्रकल्प झाला सुरु, डायघर कचराप्रकल्प दोन ते तीन महिन्यात होणार कार्यान्वित

thane garbage
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

ठाणे : डायघर घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम पुर्ण होईपर्यंत पालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेला कचरा प्रकल्प मंगळवारपासून प्रशासनाने कार्यान्वित केला आहे. यामुळे दिवा कचराभुमी अखेर बंद झाल्याने येथील नागरिकांची कचरा समस्येतून सुटका झाली आहे. तसेच डायघर घनकचरा प्रकल्प येत्या दोन ते तीन महिन्यात कार्यान्वित होणार असून यानंतर भंडार्ली प्रकल्प बंद करण्यात येणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १ हजार ५० टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी १२५ टन कचऱ्यावर विविध प्रकल्पांतर्गत शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती केली जाते. उर्वरित सुमारे ६०० टन ओला कचरा दिवा कचराभूमीवर टाकला जात होता. या कचराभूमीत आग लागण्याचे प्रकार घडत असून यामुळे परिसरात सर्वत्र धुर पसरत आहे. कचराभुमीमुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या त्रासामुळे दिवावासिया हैराण झाले आहेत. या समस्येतून सुटका करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शहराबाहेर म्हणजेच भांडार्ली गावात शास्त्रोक्त पद्धतीने कचरा विल्हेवाटीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. परंतु या प्रकल्पाच्या संचलन व देखभालीसाठी ठेकेदार मिळत नसल्याने हा प्रकल्प सुरु झाला नव्हता. यामुळे पालिकेकडून दिवा येथेच कचरा टाकला जात असल्याने पालिकेवर टिका होत होती. दरम्यान, या प्रकल्पाच्या संचलन व देखभालीसाठी पालिकेने दहाव्यांदा निविदा काढली होती. त्यास ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर पालिकेला अखेर हा प्रकल्प सुरु करण्यास यश आले आहे.

हेही वाचा >>> “राजन विचारे यांच्या सुरक्षेत कशाच्या आधारे कपात?” सुरक्षा कपातीबाबतचा अहवाल सादर करा, उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

डायघर प्रकल्पही लवकरच सुरु होणार

भंडार्ली येथे उभारण्यात आलेला कचरा प्रकल्प मंगळवारपासून सुरु करण्यात आला आहे. हा प्रकल्प सुरु झाल्यामुळे दिवा येथे कचरा टाकणे बंद करण्यात येणार आहे. भंडार्ली प्रकल्प सुरु करण्यात आला असला तरी हा प्रकल्प तात्पुरती व्यवस्था म्हणून उभारला आहे. शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी डायघर घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम सुरु असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मीती आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रीया करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात कचऱ्यापासून वीज निर्मीती करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा येत्या दोन ते तीन महिन्यात कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर भंडार्ली प्रकल्प बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 18:21 IST
Next Story
ठाणे-विटावा पादचारी पुलाचे काम पूर्णत्वास, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला पुलाच्या कामाचा पाहाणी दौरा