डोंबिवली श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त पालखी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्वागत यात्रेत यावेळी चित्ररथांचा समावेश नसेल, असे गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वागत यात्रा म्हणून यापूर्वी होणारे सर्व धार्मिक, सामाजिक कार्यक्रम मंदिरात होणार आहेत. करोना प्रतिबंधाचाचे नियम पाळून हे कार्यक्रम केले जाणार आहेत. मंदिर समितीची मंगळवारी रात्री श्री गणेश मंदिरात बैठक झाली. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत नववर्ष स्वागत यात्रा करोना प्रतिबंधाचाचे नियम पाळून आनंदात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नववर्षानिमित्त गणेश मंदिरात सर्व धार्मिक विधी, कार्यक्रम पार पडणार आहेत. प्रवचनकार अलका मुतालिक यांचे नऊ दिवस राम कथेवर प्रवचन ठेवण्यात आले आहे. मंदिराच्या आवारात हा कार्यक्रम होणार आहे, असे अध्यक्ष दामले यांनी सांगितले.

करोनाचे निर्बंध असल्याने सार्वजनिक ठिकाणची गर्दी टाळण्यासाठी पालखी यात्रेत चित्ररथ न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या दोन वर्षात करोना महासाथीमध्ये अनेक कुटुंबांमधील कर्ते पुरुष, कुटुंबातील दोन -तीन माणसं निघून गेली आहेत. अशा कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी त्यांना काही साहाय्य करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. वर्षातून एकदा येणारा चैत्र पाडवा सण नागरिकांनी आनंदात साजरा करावा, घरापुढे रांगोळ्या गुढ्या उभाराव्यात, घराबाहेर पडून रहिवाशांनी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे, हा स्वागत यात्रा करण्यामागील मुख्य उद्देश आहे, असे अध्यक्ष राहुल दामले यांनी सांगितले.

नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवात डोंबिवलीने केली. करोना साथीमुळे दोन वर्षी यात्रा रद्द करण्यात आली. यात्रेच्या उपक्रमात खंड पडू नये. लोकांना उत्साही वातावरणाचा आनंद घेता यावा, यासाठी मंदिराने गुढीपाडव्यानिमित्त सामाजिक, धार्मिक कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे दामले यांनी सांगितले.

येत्या आठ दिवसात सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, पालखी सोहळ्याची तयारी करून, पालखीचा मार्ग निश्चित केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivali gudi padwa swagat yatra in limited form no tableau asj