कल्याण पोलीस परिमंडळात वर्षभरात ८५० गुन्हे
कल्याण : कल्याण पोलीस परिमंडळात नववर्षांनिमित्त हॉटेल्स, इमारतींच्या गच्ची, बंगले, मोकळय़ा जागांवर आयोजित मेजवान्यांमध्ये कोणतेही गैरप्रकार घडू नयेत. तेथे करोना प्रतिबंधाचे नियम पाळले जातात की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी कल्याण पोलिसांनी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय कल्याण, डोंबिवली शहरांच्या १२५ चौरस किलोमीटर क्षेत्रातील मुख्य रस्ते, चौक, शहरांची प्रवेशद्वारे, मोकळी मैदाने, गर्दीची ठिकाणे, खाडी किनारे भागात बाराशे पोलिसांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये २०० पोलीस अधिकारी, ९५० पोलिसांचा सहभाग आहे, असे कल्याण परिमंडळ तीनचे उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली पालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहराच्या विविध भागांत सीसीटीव्ही लावले आहेत. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून शहरातील हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. दोन ते तीन दिवस शहरातील सर्व रस्त्यांवरील वाहनांची, संशयास्पद दुचाकी स्वार, वाहनांची तपासणी केली जाणार आहे. मद्यपान करून दुचाकी वाहने चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे उपायुक्त गुंजाळ यांनी सांगितले. नववर्षांचा आनंदोत्सव रहिवाशांनी शक्यतो घरात, गर्दी टाळून करावा. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांव्यतिरिक्त अमली पदार्थ प्रतिबंधक विभाग, उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांची पथके हॉटेल्स, ढाबे येथील हालचालींवर पाळत ठेवणार आहेत. बीअरबार चालकांना मद्यपुरवठा, वापराच्या नोंदी अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे उत्पादन शुल्क अधिकाऱ्याने सांगितले.
गुन्हे दाखल
कल्याण परिमंडळात सन २०२१ मध्ये जानेवारी ते डिसेंबर कालावधीत ८५० गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. महिलांच्या गळय़ातील मंगळसूत्र, सोनसाखळी हिसकावणे, दुचाकी चोरीचे सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, महिला चोरटय़ांचे लक्ष्य राहिल्या आहेत.