ठाणे : ठाणे ही सांस्कृतिक आणि कला नगरी असून येथे सतत सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रम होत असतात. त्यामुळे या नगरीचा वेगळा लौकिक आहे. अशा या शहराच्या सांस्कृतिक वैभवात टाऊन हॉलने भर घातली आहे. या वास्तूचे नूतनीकरण करताना ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम झाल्याचे गौरवोद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाऊन हॉलच्या उद्घाटनावेळी काढले. टाऊन हॉलचे उद्घाटन आणि अँफी थिएटरचे लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रविवारी पार पडला.

शहराचा सांस्कृतिक वारसा आणि ठाणेकरांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या टाऊन हॉलचे आणि शेजारील अँफी थिएटरचे नूतनीकरण पूर्ण झाले असून ठाणेकरांसाठी हे सभागृह खुले करण्यात आले आहे. टाऊन हॉलचे मूळ ऐतिहासिक रूप जपत हे नूतनीकरण करण्यात आले आहे. नेवासा येथून विशेष दगड आणून या हॉलच्या िभतींचे काम करण्यात आले आहे. जुन्या बांधकामाला आधुनिकतेची जोड देत टाऊन हॉल आणि अँफी थिएटरच्या रूपाने कलावंतांना एक व्यासपीठ मिळाले आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्याचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व जपण्यात टाऊन हॉलचा महत्त्वाचा वाटा आहे. ९४ वर्षे झालेल्या या वास्तूला ठाण्याच्या सांस्कृतिक दैनंदिनीत एक वेगळे स्थान आहे. या वास्तूच्या रचनेत बदल न करता त्याचे मूळ स्वरूप जपण्यात आले आहे. त्याचबरोबर अँफी थिएटरचे काम करताना येथील वृक्षांची विशेष काळजी घेतली आहे. टाऊन हॉलमधील सभागृहात बाहेरील आवाजाचा त्रास होऊ नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कलाकारांना होणाऱ्या गैरसोयी यावेळी दूर करण्यात आल्या आहेत. मे महिन्यात कलाकार आणि मान्यवरांना बोलावून येथे एक सांगीतिक कार्यक्रम करण्यात येईल. त्यावेळेस खऱ्या अर्थाने याचे लोकार्पण होईल, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले.

तलावांचे सुशोभीकरण

ठाणे हे तलावांचे शहर असून मासुंदा तलाव हे शहराचे भूषण आहे. त्याचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. यासारखेच इतर तलावांचेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या वारशांचे ऐतिहासिकपण जपले पाहिजे, असे आवाहन शिंदे यांनी केले.