दसरा आणि दिवाळीदरम्यान येणारी कोजागिरी पौर्णिमा ही खास मित्रमंडळी जमवून गप्पांच्या साथीने रात्र जागविण्याचे एक चांगले निमित्त असते. यंदा कोजागिरीच्या निमित्ताने चंद्र या विषयावरील गाणी ऐकण्याची संधी आहे. आज कितने दिनों के बाद गली में चाँद निकला, चंदा है तू मेरा सूरज है तू, चाँद आँहे भरेगा आदी अनेक गाणी रसिकांच्या स्मरणात आहेत. ‘स्वरसाज’ संस्थेतर्फे रविवारी २५ ऑक्टोबर रोजी खास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सरस्वती क्रीडासंकुल, तळमजला, नौपाडा, ठाणे (प.) येथे खास चंद्रावर आधारित अशीच काही सुश्राव्य गाणी कमलेश सुतावणी सादर करणार आहेत. प्रवेश विनामूल्य आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

’कधी-रविवार, २५ ऑक्टोबर, वेळ : सायंकाळी ५ वाजता
’कुठे- सरस्वती क्रीडासंकुल, तळमजला, नौपाडा, ठाणे (प.)

 

कथा लावणीची, अदा कथ्थकची

ठाण्यातील नृत्यधारा कथ्थक नृत्य शोध संस्थेतर्फे रविवार २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ‘कथा लावणीची, अदा कथ्थकची’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गोविंद रामकृष्ण जोशी यांना श्रद्धांजली म्हणून सादर होणाऱ्या या कार्यक्रमात नृत्यधाराच्या विद्यार्थिनी भाग घेणार आहेत. मुक्ता जोशी आणि ज्येष्ठ विद्यार्थिनींनी नृत्य-दिग्दर्शन केले आहे. कल्याणी साळुंके (गायन), अनंत जोशी (हार्मोनियम), कृष्णा मुसळे (ढोलकी) हे कलावंत त्यांना साथ देणार आहेत. नरेंद्र बेडेकर आणि अस्मिता पांडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.

’कधी-रविवार, २५ ऑक्टोबर, वेळ : सकाळी १० ते दुपारी  २

’कुठे-गडकरी रंगायतन, ठाणे (प.)

 

 

कॅमेऱ्याच्या डोळ्यांची ‘चौकट’

विविध क्षेत्रांतील ११ प्रतिभावंत आणि तरुण उदयोन्मुख छायाचित्रकार, त्यांच्या नजरेतून टिपलेली छायाचित्रे आणि विविध क्षणचित्रे पाहण्याची संधी मुंबईकर आणि ठाणेकरांच्या भेटीला चालून आली आहे. ‘मुमेंट शूट’ या संस्थेच्या वतीने ‘चौकट’ हे एक आगळेवेगळे असे छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन ठाण्यातील कलाभवन येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात अनेक प्रकारची छायाचित्रे रसिकांना अनुभवण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही भटकंती करून या सर्व ११ छायाचित्रकारांनी एक सुंदर कोलाज प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला आहे. लॅण्डस्केप, वन्य-जीवन, विविध तऱ्हेची फुले, कीटक, स्मारके, किल्ले, पौराणिक स्थळे, व्यक्तिचित्रे आणि बरेच काही इथे पाहावयास मिळणार आहे. हे प्रदर्शन २३ ते २५ ऑक्टोबर सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत सर्वासाठी विनामूल्य आयोजित करण्यात आले आहे.

’कधी- २३ ते २५ ऑक्टोबर, वेळ : सकाळी १० ते रात्री ८ वाजता

’कुठे- ठाणे कला भवन, बिग बझारजवळ, कापुरबावडी जंक्शन, ठाणे (प.)

 

माऊलींच्या वारीचे अनुभव छायाचित्र वर्णन

दरवर्षी आषाढी कार्तिकीला पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांच्या वारीचे अनेक किस्से ऐकण्यात येतात. तालासुरात नाचणाऱ्या वारकऱ्यांना मिळणारी ऊर्जा, ज्ञानदेवांवर श्रद्धा ठेवून सहभागी झालेले वारकरी आदी घडामोडी समजून घेऊन छायाकार स्टुडिओचे संदीप पाटील व त्यांचे बंधू आणि छायाचित्र कलेतील जाणकार अभय पाटील यांनी स्वत: डोंगर-दऱ्यातून माऊलींच्या वारीसोबत १३ दिवस प्रवास केला व छायाचित्रे घेत या वारीचे प्रवासवर्णन उभे केले आहे. या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात येणार असून प्रसिद्ध दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. माऊलींच्या वारीचे अनुभव पाहण्यासाठी सर्व रसिकांनी प्रदर्शनाला उपस्थित राहावे,

असे आवाहन पाटील बंधूंनी केले आहे.

’कुठे- टाऊन हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, टेंभी नाका, ठाणे (प.)

’कधी- २४ ते २७ ऑक्टोबरदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत

 

तरंग उत्सव २०१५

ठाण्यातील तक्षशिला नृत्यकला मंदिरातर्फे तरंग उत्सव २०१५चे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणारा व कश्मिरा त्रिवेदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा उत्सव आता कलाक्षेत्रात दिवसेंदिवस आपली लोकप्रियता मिळवू लागला आहे. या उत्सवात उत्कृष्ट शास्त्रीय नृत्यासाठी तरंग पद्म हा सन्मान तर, चांगले शास्त्रीय संगीत गाणाऱ्यांना सूर-ताल मणी या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. यावेळी विक्रम गौड बाथिना व गुरू दीपक मुझुमदार आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, परीक्षणासाठीदेखील कलाक्षेत्रातील दिग्गजही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या विनामूल्य कार्यक्रमाला सर्व रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

’कुठे- शनिवार, २४ ऑक्टोबरला गडकरी रंगायतन, ठाणे (प.) येथे तर, २५ ऑक्टोबरला काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे (प.)

’कधी- दोन्ही दिवसांचे कार्यक्रम सकाळी ८ नंतर सुरू होतील.

 

डोंबिवलीत सोमवारपासून ‘गीतरामायण’

चिन्मय मिशन डोंबिवलीतर्फे २६ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत आदित्य सभागृह, डोंबिवली (पूर्व) येथे गीतरामायणावर आधारित संगीत प्रवचने सादर होणार आहेत. चिन्मय मिशनचे आचार्य विवेक हे गीतरामायणातील सर्व गाणी सादर करतील तर आचार्य वर्षां आध्यात्मिक निरूपण करतील. संगीत रसिक आणि भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

’कधी- २६ ते ३१ ऑक्टोबर, वेळ : सायंकाळी ७ ते रात्री ९

’कुठे- आदित्य सभागृह, डोंबिवली (पू.)

 

शिट्टीगीतांचे सादरीकरण 

‘शिट्टी’, ‘स्वरसाज’ या संस्थेच्या वतीने संगीत संग्राहक कमलेश सुतावणे नावीन्यपूर्ण कार्यक्रम सादर करीत असतात. याच मालिकेतील ५२ वा कार्यक्रम येत्या शनिवारी संध्याकाळी ५ वाजता ब्राह्मण सेवा संघ, दुसरा मजला, नौपाडा, ठाणे (प.) येथे होणार आहे. या कार्यक्रमात हिंदी चित्रपटातील शिट्टीचा वापर केलेली गाणी ते सादर करणार आहेत.

’कधी- शनिवार, २४ ऑक्टोबर, वेळ : सायंकाळी ५ वाजता

’कुठे- ब्राह्मण सेवा संघ, दुसरा मजला, नौपाडा, ठाणे (प)

 

प्रा. डी. जी. पुजारे यांच्या चित्रांचे आर्ट प्रिव्हिलेजमध्ये कला प्रदर्शन

 

ज्येष्ठ चित्रकार प्रा. दामोदर पुजारे यांनी काढलेल्या चित्रांचे (प्लेटो ग्राफ) प्रदर्शन २२ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत आर्ट प्रिव्हिलेज गॅलरी, ब्राह्मण सोसायटी, नौपाडा, ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आमदार संजय केळकर व महाराष्ट्र महिला मोर्चा भाजप प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. माधवी नाईक यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पुजारे यांनी आतापर्यंत विविध माध्यमांत कलानिर्मिती केली असली तरी त्यांचा खास उल्लेख केला जातो तो  निर्माण केलेल्या वुडकटरमधील खास शैलीचा.

’कधी – २२ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर , वेळ : दुपारी १२ ते सायंकाळी ७

’कुठे – आर्ट प्रिव्हिलेज गॅलरी, ब्राह्मण सोसायटी, नौपाडा, ठाणे (प.)

 

‘ग्रंथाली’च्या तीन पुस्तकांचे प्रकाशन

शिल्पा खेर लिखित ए मेरे वतन के लोगों, सोल्जर इन मी आणि जस्ट बिलिव्ह या तीन पुस्तकांचे प्रकाशन येत्या बुधवारी २८ ऑक्टोबर रोजी गडकरी रंगायतन येथे संध्याकाळी ५ वाजता माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते होणार आहे.

 

जागतिक दृक् श्राव्य वारसा दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

महाराष्ट्रात संगीत प्रकारांचे वैविध्य आणि विपुलता आढळते. नाटय़संगीताला महाराष्ट्राचे ‘कलासंगीत’ असे संबोधले जाते. तसेच ‘भावगीत’ हाही एक वैशिष्टय़पूर्ण संगीत प्रकार आहे. मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या विविध कवींनी गेय गीते लिहिली आणि या गीतांना अनेक नामवंत संगीत दिग्दर्शकांनी सुमधुर चाली लावल्या. प्रसिद्ध तसेच अप्रसिद्ध गायक कलावंतांनी ही गीते गायली. अशाच रचनांच्या श्रवणाचा अनोखा कार्यक्रम ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. अमरेंद्र धनेश्वर सादर करणार आहेत. श्रवणासोबत ते रागदारीचा अंश अथवा घटक प्रत्यक्ष गाऊन दाखवतील. त्यांना व्हायोलिनवर कैलाश पात्र आणि तबल्यावर मुक्ता रास्ते हे कलावंत साथसंगत करणार आहेत. २७ ऑक्टोबर या जागतिक दृकश्राव्य वारसा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने हा कार्यक्रम होणार असून सर्वासाठी खुला आहे.

’मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता

’पु. ल. देशपांडे सभागृह, रवींद्र नाटय़ मंदिर संकुल, प्रभादेवी

 

‘इनर आय’

चित्रांचे समूह प्रदर्शन असले की चित्ररसिकांना एकाच ठिकाणी निरनिराळ्या शैली, तंत्र, माध्यमे, दृष्टिकोन, आशय-विषय-मांडणी, विविध चित्रप्रकार अशा सगळ्यांतले वैविध्य पाहण्याची संधी मिळते. ‘इनर आय’ या समूह प्रदर्शनातही पूर्वी पटेल, प्रकाश नवले, अंकुल भट्ट, शीतल आर्झरे, रितू पांचाळ, पद्मजा वाघ, प्रिया जेठवा या कलावंतांची विविध चित्रे पाहायला मिळतील.

’२३ ऑक्टोबपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६

’आर्ट एण्ट्रन्स कला दालन, आर्मी अ‍ॅण्ड नेव्ही बििल्डग, काळा घोडाजवळ, म. गांधी मार्ग

 

‘सिरॅफेस्ट २०१५’

सिरॅमिकच्या अनेकविध आकारातील आकर्षक वस्तू आपल्याला भेट म्हणून देता येतात. दिवाळीत अनेक प्रियजनांना भेट म्हणून देण्यासाठी तसेच आपल्या संग्रहात ठेवण्यासाठीही सिरॅमिकच्या वस्तू तसेच कलाकृती पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळत आहे. स्टुडिओ पॉटर्स असोसिएशनच्या वतीने ‘सिरॅफेस्ट २०१५’ प्रदर्शन भरविण्यात आले असून  क्रिकेट खेळणारा गणपती, विविध आकारांतील वाडगे, फळे ठेवण्यासाठीचे भांडे, टेबल यांसारख्या सिरॅमिकच्या कलाकृती या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.

’२३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७

’छत्रपती शिवाजी महाराजा वस्तुसंग्रहालय (म्युझियम), काळा घोडा

 

रविवारी संगीतमैफल

‘कलाभारती’च्या सहकार्याने ‘सूरसप्तक ट्रस्ट’ची स्थापना ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. यानिमित्ताने सकाळची संगीत मैफल होत असून त्यामध्ये अनिष प्रधान यांचे एकल तबलावादन आणि तेजश्री आमोणकर यांचे गायन ऐकण्याची संधी मिळणार आहे. त्यांना हार्मोनियमवर सुधीर नायक, चिन्मय कोल्हटकर तर तबल्यावर शंतनू शुक्ल हे कलावंत साथसंगत करणार आहेत. अनिष प्रधान यांनी निखिल घोष यांच्याकडे तबलावादनाचे धडे गिरविले आहेत. तेजश्री आमोणकर या किशोरी आमोणकर यांच्या शिष्या आहेत. हा कार्यक्रम संगीतप्रेमी रसिकांसाठी खुला आहे. संपर्क – ९९६७३६५२४१.

’कर्नाटक संघ सभागृह, मोगल लेन, माटुंगा पश्चिम रेल्वे

’रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी १

 

हृदयनाथ आणि रेहमान

हृदयेश आर्ट्स या संस्थेतर्फे दिला जाणारा हृदयनाथ पुरस्कार यंदा आघाडीचे संगीतकार ए. आर. रेहमान यांना घोषित झाला आहे. पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा ७८वा वाढदिवस, तसेच हृदयेश आर्ट्सच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात रेहमान यांना प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. हृदयेश आर्ट्स आणि सोहम प्रतिष्ठानतर्फे होत असलेल्या या कार्यक्रमात पं. हृदयनाथ मंगेशकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. या वेळी या हृदयनाथ व रेहमान या दोघांच्या रचनांचे सादरीकरण होणार आहे. पद्मजा फेणाणी जोगळेकर, विभावरी आपटे जोशी, हृषीकेश रानडे, राधा मंगेशकर, डॉ. सलील कुलकर्णी, सुचिश्मिता दास, हेमा सरदेसाई, जावेद अली हे गायक-गायिका सहभागी होणार असून संगीत संयोजन अविनाश चंद्रचूड यांचे आहे.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश भिमाणी करणार आहेत.

’दीनानाथ नाटय़गृह, विलेपार्ले पूर्व

’सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Event in thane