रेल्वेमंत्र्यांकडून उपनगरीय रेल्वे प्रवासातील गर्दीचा अनुभव
किशोर कोकणे
ठाणे : करोना काळातही गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या मध्य रेल्वेच्या ठाणेपलीकडे वास्तव्य करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे दररोजचे धकाधकीचे जीवन शुक्रवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना काही काळाकरिता अनुभवता आले. ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या उद्घाटनानिमित्त रेल्वेमंत्री सकाळपासूनच ठाणे परिसरात मुक्काम ठोकून होते. भाजप कार्यकर्त्यांसोबत सकाळी निवांत गप्पा मारल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी दुपारपासून उपनगरीय रेल्वेगाडीच्या सामान्य डब्यातून ठाणे ते दिवा असा प्रवास करत प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपचे नेते, कार्यकर्ते, प्रसिद्धी माध्यमे, सुरक्षारक्षकांचा गराडा कायम राहिल्याने त्यांचा हा प्रवासी संवाद फारच अल्पजीवी आणि तोकडा ठरला.
ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण शुक्रवारी मोठय़ा दिमाखात करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे प्रशासनाची जय्यत तयारी सुरू होती. ठाणे रेल्वे स्थानकातील पंखे, छप्पर चकाचक करण्यात आले होते, तर थुंकून लाल झालेल्या भिंतींना रंगरंगोटी करण्यात आली होती. या मार्गिकांचे लोकार्पण थेट पंतप्रधानांच्या हस्ते होत असल्याने भाजप नेत्यांनी हा सोहळा भव्य होईल याची पुरेपूर काळजी घेतली होती. भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी पुढाकार घेत यानिमित्ताने ठाणे स्थानकात येणारे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ठाणेकर प्रवाशांना अधिकाधिक वेळ कसा देतील यासंबंधीचे नियोजन केले होते. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील हे ठाणे स्थानकात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. काही काळ भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर वैष्णव यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याचा निर्णय घेतला.
ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोन येथून त्यांनी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास दिवा येथे जाण्यासाठी उपनगरीय रेल्वेगाडी पकडली. रेल्वेमंत्र्यांचा प्रवास ठाणे महापालिका हद्दीत येत असलेल्या ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या स्थानकांपर्यत मर्यादित ठेवण्याचे पद्धतशीर नियोजन करण्यात आले होते. असे असले तरी रेल्वेमंत्र्यांच्या या प्रवासादरम्यान त्यांच्याभोवती भाजपचे कार्यकर्ते, आमदार आणि खासदार, अधिकारी आणि माध्यमांच्या प्रतिनिधींचा गराडा अधिक होता. त्यामुळे एखाद-दुसऱ्या प्रवाशाशिवाय वैष्णव यांना प्रवाशांसोबत संवाद साधता आला नाही.
वडापाव आणि चहाचा आस्वाद
ठाणे स्थानकात उतरल्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी ठाण्यातील कोपरी येथील एका उपाहारगृहात जाऊन वडापावचा आस्वाद घेतला. त्यानंतर उपाहारगृहाशेजारी असलेल्या छोटय़ाशा चहाच्या दुकानात जाऊन चहा घेतला. तसेच या ठिकाणी या मंत्र्यांनी गप्पांचा फड रंगविला.
दिवा स्थानकात प्रवाशांचे हाल
दिवा रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर भाजपचे दिवा शहरातील कार्यकर्ते बॅण्ड-बाजा पथकासह त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते दिवा स्थानकात असल्याने प्रवाशांचे हाल झाले. फलाट क्रमांक सहावर एका छोटय़ा मंचावरून रेल्वेमंत्र्यांनी काहीवेळ मराठीतून संवाद साधला. त्यानंतर पुन्हा कुर्ला रेल्वेगाडीने ते ठाणे स्थानकात दाखल झाले.