ठाणे – येत्या २५ जुलै पासून श्रावण महिन्यास प्रारंभ होत आहे. श्रावण महिन्यात अनेकजण मांसाहार घेण्याचे टाळतात. त्यामुळे श्रावण महिना सुरु होण्याच्या एक आठवडापूर्वी अनेकांचा कल हा गतहारी साजरी करण्याकडे असतो. यासाठी काहीजण मित्रमंडळींसह घरातच नियोजन आखतात. तर, काहीजण बाहेर शेतघरांवर जाऊन गतहारी साजरी करण्यास पसंती देतात. यंदाही ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, नेरळ, कर्जत तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक शेतघर (फार्महाऊस)च्या नोंदणी शनिवार – रविवारसाठी हाऊस फुल्ल झाल्याचे चित्र आहे.
आषाढ आमावस्येनंतर यंदा २५ जुलै पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. श्रावण महिना हिंदु संस्कृतीत खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात मांसाहाराचे सेवन करणे अनेकजण टाळतात. जवळपास एक ते दीड महिने मांसाहाराचे सेवन करता येत नाही म्हणून श्रावण सुरु होण्याच्या एक आठवड्याआधी गतहारी साजरी करण्याकडे अनेकांचा कल असतो. पूर्वी घरगुती स्वरुपात सर्व नातेवाईक एकत्रित येऊन गतहारी साजरी करत होते. परंतू, कालांतराने बदलला असून प्रत्येक सण-उत्सव साजरे करण्याची पद्धत बदलली आहे. आधी केवळ नववर्षाचे स्वागत मित्र-मंडळी किंवा नातेवाईकांसह शेतघरांवर (फार्म हाऊस) जाऊन केले जात होते. मात्र, अलिकडे गतहारी देखील शेतघरावर जाऊन साजरी करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. यंदा ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, नेरळ, कर्जत तसेच ग्रामीण भागातील अनेक शेतघरांची नोंदणी या आठवड्यातील शनिवार-रविवारसाठी फुल्ल झाल्याची माहिती समोर आली आहे.
नेरळ भागात सहलीसाठी येणाऱ्यांना मार्गदर्शन करणारे स्थानिक मार्गदर्शक गोपाल जोरी सांगतात की, जुलै महिना हा पावसाळी सहलींचा महिना असतो. त्यामुळे या महिन्यात शेतघर, रिसॉर्ट तसेच धबधब्यांवर सहलीसाठी अनेकजण येतात. यंदा गतहारीसाठी देखील नेरळमधील सर्वाधिक शेतघरांची १०० टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे.
कल्याण-बदलापूर रोडवर मायशा नॅचर स्टे शेतघर आहे. याठिकाणी एका दिवसाचे प्रती व्यक्ती २ हजार रुपये आकारले जातात. या शेतघरांची रविवार-शनिवार साठी नोंदणी पूर्ण झाली आहे. परंतू, तरी देखील या शेतघराच्या नोंदणीसाठी ग्राहक संपर्क साधत असल्याची माहिती या शेतघराचे विक्रम गायकर यांनी दिली.
शेतघरावर या सुविधा दिल्या जातात…
प्रत्येक शेतघराचे प्रतिव्यक्तीमागे वेगवेगळे दर आकारले जातात. साधारणतः १५०० रुपयांपासून ते ३ हजार रुपयांपर्यंत प्रति व्यक्ती दर आकारले जातात. यात, दोन वेळची न्याहरी, दोन वेळचे जेवण त्यासह, विविध खेळ आणि इतर सुविधा दिल्या जातात.
गतहारीनिमित्त यंदाच्या शनिवार-रविवारसाठी आमच्याकडे ९० टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. यात, सर्वाधिक कुटूंब गटाचा समावेश आहे. एखाद दुसरा गट हा महाविद्यालयीन तरुणांचा आहे. – अंकुश मोरे, मालक, गोपी रिसॉर्ट. नेरळ