डोंबिवली: ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानका जवळील सर्वोदय हिल्स या १७ माळ्याच्या इमारतीला शनिवारी सकाळी अचानक आग लागली. इमारतीच्या तळ मजल्यावरील वीज मीटर पेटीतील शाॅर्ट सर्किटमुळे ही लाग लागल्याचे रहिवाशांनी सांगितले. इमारतीमधील सर्व विद्युत यंत्रणा आगीत खाक झाली आहे. इमारतीचा विद्युत पुरवठा बंद पडला आहे.
सर्वोदय हिल्स इमारतीच्या तळ मजल्यावर सर्व सदनिकांना विद्युत पुरवठा करण्यात येणारी मीटर यंत्रणा आहे. या मीटरच्या भागात शनिवारी सकाळी शाॅर्ट सर्किट झाले. या वीज वाहक तारांमधील आग वीज पुरवठा झालेल्या इमारतीमधील सर्व सदनिका, भागांपर्यंत पोहचली. वीज वाहिनीवरील वेष्टन पेटत गेल्याने आग इमारतीच्या सर्व भागात पोहचली. वीज वाहिन्या पेटल्यानंतर निर्माण होणारी दुर्गंधी परिसरात पसरली होती.
इमारतीला आग लागल्याचे समजताच रहिवासी उद्वाहन, जिन्यांवरुन खाली पळू लागले. इमारतीच्या आतील मोकळ्या जागेत धूर जमा झाला. दोन ते तीन रहिवासांना कोंडलेल्या धुराचा त्रास झाला. अग्निशमन दलाला संपर्क करण्यात आल्यानंतर पालिका अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तात्काळ वीज मीटर पेटीचा ताबा घेऊन तेथील विद्युत यंत्रणा बंद केली. पाण्याचे फवारे मारुन आग आटोक्यात आणली. इमारतीच्या सदनिका, दरवाजा बाहेरील सर्व वीज वाहिन्या जळून गेल्याने दरवाजांबाहेरील भाग काळे पडले आहेत, अशी माहिती या इमारती मधील रहिवासी प्रतीक कोठावदे यांनी दिली.