ठाणे : नेरुळ येथील एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे सांगून मध्यस्थांचे अपहरण करून त्यांच्या कुटुंबियांकडून सुमारे ५० हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या ठाणे शहराध्यक्षासह पाचजणांविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरमानगर येथे तक्रारदार जयेश पटेल हे राहतात. त्यांचे किराणा दुकान आहे. त्यांच्या ओळखीच्या एका मुलीला नेरूळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. त्यामुळे जयेश यांचे वडील प्रेमजी यांनी विद्यार्थी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष प्रथमेश यादव याला संपर्क साधला. प्रथमेशने अजित ओझा याला संपर्क करण्यास सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “…म्हणून एकत्र निवडणुकांचा घाट”, माजी मंत्री अनंत गीते यांचा गंभीर आरोप, म्हणाले…

महाविद्यालयातील प्रवेशासाठी ६७ लाख ५० हजार आणि स्वत:चे १० लाख द्यावे लागतील, असे ओझा याने सांगितले. प्रेमजी यांनी याबाबत मुलीच्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी सहमती दर्शवली. ओझा याने २५ ऑगस्टला कागदपत्रे घेऊन त्यांना नेरूळ येथे येण्यास सांगितले. परंतु, पैशांची जुळवाजुळव होऊ शकली नव्हती. त्यामुळे आणखी काही दिवसांचा कालावधी प्रेमजी यांनी मागितला. त्यानंतर त्यांनी मानपाडा येथे भेटण्याचे ठरविले. प्रेमजी हे त्यांचा मुलगा जयेश आणि एका मित्राला घेऊन तेथे गेले असता, त्याठिकाणी  प्रथमेश यादव, अजित ओझा, पवनुमार मिश्रा, विनीत तिवारी आणि विष्णु घाडगे आले. त्यांनी मारहाण करीत प्रेमजी आणि त्यांच्या मित्राला गाडीत बसवून अपहरण केले. त्यांना काही मीटर अंतरावर नेऊन दमदाटी केली. याठिकाणी वडीलांचा शोध घेत जयेश पोहचले. त्यावेळी कळंबोली येथे भेटण्यास आला नाहीस म्हणून ५० हजार रुपये दे तरच वडिलांना सोडू असे त्यांनी जयेश यांना धमकाविले. तसेच त्यांच्याकडून त्यांनी ४९ हजार ९८० रक्कम खंडणी उकळली. याबाबत पोलिसांना कळविल्यास वाईट परिणाम होतील, असा दमही दिला. याप्रकरणी जयेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five including congress student union president booked for demanding extortion zws