ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात कातकरी महिला बचत गटांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या योजना परस्पर लाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कातकरी महिला बचत गटांना शेळ्या आणि अवजारांचे वाटप करण्यात येते. मात्र जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाने अडीच लाखांच्या शेळ्या मंजूर करूनही त्या महिलांच्या हाती न आल्याने त्या शेळ्या नक्की कुणी फस्त केल्या, असा प्रश्न श्रमिक मुक्ती संघटनेने उपस्थित केला आहे. या प्रकरणी दहा दिवसांत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी दिले.
शासकीय योजना तळागाळातल्या व्यक्तींपर्यंत पोहोचत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र योजना मंजूर होऊनही त्याचा लाभ लाभार्थ्यांना मिळत नसल्याचा प्रकार मुरबाड तालुक्यात समोर आला आहे. मुरबाड तालुक्यातील शेलगाव येथे अनिता बचत गट या नावाने कातकरी महिलांचा बचत गट आहे. या गटाला ठाणे जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने २ लाख ५० हजार रुपयांची शेळीपालन योजना मंजूर झाली. त्या योजनेअन्वये शेळ्यांचे वाटपही झाल्याची कागदोपत्री नोंद आहे. मात्र या योजनेतल्या शेळ्या कातकरी महिलांना मिळाल्याच नाहीत. त्यामुळे या योजनेतील शेळ्या कुणी फस्त केल्या, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणे एका दुसऱ्या प्रकरणात या अनिता महिला बचत गटातील सहा कातकरी महिलांची नावे दुसऱ्या शुभम शेतकरी बचत गटामध्ये दाखवून हरित यंत्रे अर्थात अवजार बँक योजना लाटल्याचेही समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने २०१९-२० या वर्षात ५ लाखांची ही अवजार बँक महिलांच्या या बचत गटासाठी मंजूर केली होती. मात्र ज्या महिलांच्या नावे ही योजना मंजूर झाली त्यांना या योजनेबद्दल साधी कल्पनाही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही अवजारे दुसऱ्याच एका बिगरआदिवासी बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या या योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आता होत आहे. या योजनेतल्या शेळ्या आणि अवजारे पुन्हा लाभार्थी कातकरी महिला बचत गटांना मिळाव्यात, अशी मागणी श्रमिक मुक्ती संघटनेने केली आहे. या प्रकरणात सुमारे ७ लाख ५० हजारांचा अपहार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
