ठाण्यातील मोठय़ा नाल्यांमध्ये कचरा कायम; ठेकेदारांच्या देयकांना पालिकेची कात्री?

पावसाळय़ापूर्वी ठाण्यातील ९०-९५ टक्के नाल्यांची सफाई झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा परिसरांतील मोठय़ा नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा कायम असल्याचे दिसून येत आहे. मोसमी पाऊस दाखल झाला असला तरी, ठाणे शहरातील महत्त्वाच्या नाल्यांची सफाई झाली नसल्याचे चित्र आहे. दिवा, मुंब्रा, कळवा आणि लोकमान्य नगर येथील नाले अजूनही कचऱ्याने तुडुंब भरले आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळय़ात शहरांतील विविध भागांमध्ये पाणी तुंबण्याची समस्या कायम राहील, अशी भीती आहे. दरम्यान, कामे वेळेत पूर्ण न करू शकणाऱ्या ठेकेदारांच्या देयकांतून रक्कम वजा करण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाने चालवल्या आहेत.

पावसाळ्यात शहरातील नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिका प्रशासनाने यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच नालेसफाईची कामे हाती घेतली. ही कामे लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी दहा प्रभाग समिती स्तरावर नालेसफाईच्या कामासाठी ६५ ठेकेदार नेमण्यात आले होते. याशिवाय सफाईकामांवर देखरेख ठेवण्यासाठी ६५ पालिका अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली होती. परंतु, नालेसफाई पूर्ण करण्यासाठी दिलेली ३१ मेची मुदत पूर्ण होऊन आता १५ दिवस झाले तरी अनेक भागांत नालेसफाईची कामे सुरूच आहेत. त्यामुळे ९०-९५ टक्के नाल्यांची सफाई झाल्याचा पालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे.

या कामातील एकंदर भोंगळ कारभार पाहाता आता ठेकेदारांच्या मुसक्या आवळण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नालेसफाईच्या कामांचे कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात आले असून त्यामध्ये जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ठेकेदाराने प्रत्यक्षात किती नालेसफाई केली, त्याप्रमाणेच त्यांना कामाचे बिल दिले जाणार आहे. तसेच ७ जूनच्या वाढीव मुदतीनंतर उर्वरित कामांचे पैसे ठेकेदारांना द्यायचे नाही, असा निर्णय घेण्यात आल्याचेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.

नालेसफाई

कुठे, किती?

प्रभाग समिती   टक्केवारी

नौपाडा                    ९४

उथळसर                 ९६

मानपाडा                 ९३

वर्तकनगर               ९७

वागळे इस्टेट           ९२

लोकमान्यनगर      ९५

कोपरी                     ९६

रायलादेवी               ९३

मुंब्रा                        ९०

कळवा                    ९२