मुंब्रा बाह्य़वळण मार्गाच्या आणखी दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची निविदा

किशोर कोकणे

ठाणे : मुंब्रा बाह्यवळण (बायपास) मार्गाच्या दुरुस्तीचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला असून त्यासाठी २६ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. या निविदा प्रक्रियेनंतर आठ महिन्यांसाठी मुंब्रा बाह्यवळण मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, २०१८ मध्ये या पुलाच्या दुरुस्तीसाठी साडेचार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. मागील वर्षी पावसाळय़ामध्ये येथील खड्डे बुजविण्यासाठी लाखो रुपये खर्च झाले होते. या मार्गाची वारंवार दुरुस्ती होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून दररोज मोठय़ा प्रमाणात अवजड वाहने बाहेर पडतात. टोल टाळण्यासाठी या वाहन चालकांकडून मुंब्रा बाह्यवळण मार्गाचा वापर केला जातो. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, बांधणीपासून या मार्गाची दुरवस्था झाल्याचा अनुभव प्रवासी घेत आहेत. या मार्गाच्या रेतीबंदर भागातील पुलाची अवस्था अत्यंत वाईट आहे. दरवर्षी पावसाळय़ात पोहोच रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असतात. मे २०१८ मध्ये या मार्गावरील रेतीबंदच्या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. अवघ्या ६०० मीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला चार महिन्यांचा कालावधी लागला होता. या काळात हा मार्ग बंद ठेवल्याने ठाणे, नवी मुंबई, भिवंडी येथील मुख्य मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच पुन्हा एकदा या रस्त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. मुंब्रा बाह्यळणाचा पोहोच रस्ता अवजड वाहनांसाठी योग्य नाही. त्यामुळे या पोहोच रस्त्यावर सिमेंट काँक्रीटचा जाड थर टाकला जाणार आहे. तसेच काही अंतर्गत दुरुस्ती केली जाणार आहे. गुरुवारी या त्यासंदर्भाची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने काढली आहे.

२६ कोटी ३० लाख ३८ हजार ६०० रुपये इतका अंदाजित खर्च या कामासाठी येणार असून काम पूर्ण करण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे. या कामामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार असून ठाणे शहर पुन्हा वाहतूक कोंडीच्या कचाटय़ात सापडणार आहे. चार वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने साडेचार कोटी रुपये खर्च केले होते. त्याचवेळी या रस्त्याची दुर्दशा पाहून ही दुरुस्ती का करण्यात आली नाही. असा प्रश्न वाहन चालकांकडून विचारला जात आहे.

चार वर्षांपूर्वी मुंब्रा बाह्यवळण मार्गावर आवश्यक ते काम करण्यात आले होते. परंतु या मार्गावर पुन्हा खड्डे पडू लागले आहे. त्यामुळे कायमस्वरूपी उपायोजना म्हणून याठिकाणी दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. 

– अशोक कांबळे, अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग.