ठाणे : भिवंडी वडपे मार्गावरील एका रेस्टाॅरंटमध्ये हुक्का पार्लर सुरु करुन रात्री उशीरापर्यंत हुक्का पार्टी केली जात होती. अखेर भिवंडी तालुका पोलिसांनी या रेस्टाॅरंटवर कारवाई करून या प्रकरणी रेस्टाॅरंटचा मालक आणि व्यवस्थापक या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणात १५ हुक्क्याचे पाॅट्स, हुक्का फ्लेवर आणि गुटखा जप्त केला आहे.

भिवंडी वडपे मार्ग भागात मोठ्याप्रमाणात ढाबे, रेस्टाॅरंट, हाॅटेल आहेत. भिवंडी तालुका पोलिसांचे पथक २९ जुलैच्या मध्यरात्री गस्ती घाल होते. त्यावेळी भिनार भागातील एका रेस्टाॅरंटमध्ये हुका पुरविला जात असल्याची माहिती भिवंडी तालुका पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघचौरे, पोलीस हवालदार एस.बी.गिरी, पोलीस शिपाई कर्ण जाधव, सी.पी. विशे हे पंचांसोबत घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी रेस्टाॅरंटमध्ये प्रवेश केला असता, तिथे काहीजण हुक्का ओढत असल्याचे निदर्शनास आले. पोलीस येत असल्याचे पाहून हुक्का सेवन करणाऱ्यांनी तेथून पळ काढण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी रेस्टाॅरंटच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेतले. त्याची विचारणा केली असता, रेस्टाॅरंट मालकाच्या सांगण्यावरून त्याने हा प्रकार केल्याची कबूली दिली. त्याने ग्राहकांना हुक्का सेवनासाठी साहित्य पुरविले होते.रेस्टाॅरंटमध्ये काय सापडले- याप्रकरणात पोलिसांनी कारवाई करुन ९ हजार रुपये किमतीचे १५ हुक्का पाॅट्स, पाईप, कोळसा जप्त केला. तसेच ६०० रुपये किमतीचा मानवी आरोग्यास हानीकारक असलेला हुक्का फ्लेवर आणि १८० रुपये किमतीचा गुटखा देखील जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलिसांनी रेस्टाॅरंटचा मालक आणि व्यवस्थापक अशा दोघांविरोधात फिर्याद दाखल केली. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ – ३३ (डब्यू) : सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम, २००३ – २१ (अ), ४ (अ), भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ चे कलम १२३, २७५, २८७ प्रमाणे भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हणून कारवाई

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मानवी जीवितास धोका होऊ शकतो याची जाणीव असतानाही आरोपींनी ग्राहकांना नशाकारक द्रव्य सेवनासाठी देणे, त्याचप्रमाणे जळणारा कोळसा सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर ठेऊन मानवी जीवितास धोका निर्माण करणे, वेळेपेक्षा उशिरापर्यंत रेस्टाॅरंट सुरु ठेवणे अशा विविध कलमांनुसार ही कारवाई झाली आहे.