मांडा-टिटवाळा येथील राहत्या घरात पती-पत्नीची हत्या झाल्याचा प्रकार गुरुवारी संध्याकाळी उघडकीला आला. या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या मुलाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.मांडा येथे अशोक भोसले (५५), पत्नी विजया भोसले (५०) आणि त्यांचा मुलगा असे कुटुंब राहते.

अशोक आणि विजया यांच्या घरातून गुरुवारी संध्याकाळी दुर्गंधी येऊ लागली. ही माहिती टिटवाळा पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी आले. त्यांना घरात पती, पत्नीची हत्या केल्याचे आढळले. हा प्रकार बुधवारी संध्याकाळी झाला असण्याचा संशय पोलिसांना आहे.दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत, असे टिटवाळा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले.
ही हत्या कोणी आणि कशासाठी केली याचे कोणतेही धागेदोरे सध्या उपलब्ध नाहीत.

या प्रकरणात अशोक यांच्या मुलाला प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, असे सुत्राने सांगितले. या घटनेने टिटवाळ्यात खळबळ उडाली आहे.