कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेल्या टपऱ्या, राहुटय़ा एमआयडीसीच्या पथकाने जमीनदोस्त केल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी होणारी वाहतूक कोंडी कमी झाली आहे. गेल्या चार महिन्यापासून शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा टपऱ्या, कायमस्वरूपी राहुटय़ा बांधण्याचा धंदा परप्रांतीय मंडळींनी स्थानिक रहिवाशांच्या आशीर्वादाने सुरू केला होता.
loksatta-dakhalगोळवली ते शिळफाटा या मुख्य रस्त्यावर पत्र्याच्या टपऱ्या उभारून तेथे आंबे विक्री, कपडा, गादी, हेल्मेट विक्रीचे व्यवसाय परप्रांतियांनी सुरू केले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजू अडवून हे धंदे सुरू होते. या वस्तू खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर वाहन उभे करून खरेदी करीत होते. त्यामुळे मुख्य रस्त्यावर नियमित वाहतूक कोंडी व्हायची. हे बेकायदा धंदे बंद करण्याचा प्रयत्न एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केला की, स्थानिक भूमिपूत्र अधिकाऱ्यांना दमदाटी करून परतून लावत होते.
‘या रस्त्यांसाठी आम्ही जमीन दिली आहे. मग, या जमिनीचा थोडा भाग आम्ही काबीज केला तर बिघडले कोठे’ असा सवाल ते अधिकाऱ्यांना करीत होते.
या बेकायदा टपऱ्या, झोपडय़ांमुळे पनवेल, नवी मुंबई, अंबरनाथ, तळोजाकडे नोकरी, व्यवसायानिमित्त जाणारे नोकरदार, व्यावसायिकांना सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. शिळफाटा परिसरात अनेक शाळा आहेत. या शाळांच्या बसना शाळा सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार होता. उघडपणे तक्रार केली तर भूमिपुत्रांचा त्रास होईल, या भीतीने उघडपणे कुणीही तक्रार करीत नव्हते. ‘लोकसत्ता ठाणे’ने या विषयी सतत आवाज उठवल्याने एमआयडीसी अधिकाऱ्यांनी मनावर घेऊन या मार्गावरील टपऱ्या तोडून टाकल्या आहेत.

’भूमिपुत्रांकडून अधिकाऱ्यांना टपरी उभारताना पहिले ताडपत्रीचा निवारा उभारला जात होता.

’हा निवारा आठवडय़ानंतर पत्रे बांधून पक्का केला जात होता.

’त्यानंतर अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नाही हे पाहून त्या जागी विटांचे पक्के बांधकाम करून गाळा बांधण्यात येत होता.

’अशाप्रकारे शेकडो गाळे पत्रीपूल ते शिळफाटय़ादरम्यान भूमाफियांनी उभारले आहेत.

’शिळफाटा रस्ता साठ फूट रूंद आहे. टपऱ्यांमुळे हा रस्ता दोन्ही बाजुने दाबण्यात आल्याने तीस

’फूट रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरू होती. अरूंद रस्त्यामुळे येथे सातत्याने वाहतूक कोंडी व्हायची.