कल्याण : कल्याण पश्चिमेतील पत्रीपुलाजवळील रहेजा गृहसंकुलातील एका इमारतीच्यालगत असलेल्या मदरशाच्या भागात बेकायदा बांधकाम करण्यात आले आहे, अशी तक्रार एका महिला डाॅक्टरने पालिकेच्या क प्रभागाकडे केली होती. या तक्रारीची खात्री केल्यानंतर अशाप्रकारचे बेकायदा बांधकाम झाल्याचे आढळल्यावर पालिकेच्या क प्रभागाच्या तोडकाम पथकाने साहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्या उपस्थितीत रविवारी हे बेकायदा बांधकाम तोडून टाकण्यात आले.

रहेजा गृहसंकुलातील सत्यम इमारतीच्या तळमजल्याला असलेल्या मदरशाच्या भागात एक बेकायदा बांधकाम करण्यात आले आहे, अशी तक्रार एका महिला डाॅक्टरने पालिकेच्या क प्रभागाकडे केली होती. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे क प्रभागाचे साहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी पत्रीपुलाजवळील रहेजा गृहसंकुल येथे सत्यम इमारतीलगत झालेल्या बांधकामाची खात्री केली. हे बांधकाम करणाऱ्यांकडे या कामाची परवानगी मागितली. पण कोणतीही कागदपत्रे संबंधितांकडून पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आली नाहीत. किंवा अशी कोणतीही परवानगी हे बांधकाम करताना संबंधितांनी घेतली नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे निदर्शनास आले.

रहिवास असलेल्या इमारतीच्या तळमजल्याला मदरशाच्या बांधकामात फेरबदल करून हे नव्याने बांधकाम केले असल्याचे लक्षात आल्यावर साहाय्यक आयुक्त थोरात यांनी तोडकाम पथकाला घेऊन रविवारी जेसीबीच्या साहाय्याने मदरशाचे बेकायदा बांधकाम तोडून टाकले. ही कारवाई होत असताना काही काळ या भागात तणावाचे वातावरण होते. परंतु, तोडकाम पथकातील पोलिसांनी संबंधितांना शांत राहण्याची सूचना केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशा पध्दतीने हे बेकायदा बांधकाम पालिकेने तोडून टाकले.