डोंबिवली: पावसाळा सुरू झाल्याने नैसर्गिक नाले, ओढे, गटारांचे प्रवाह बंद करून उभारण्यात आलेल्या डोंबिवलीतील भोपर, आयरे, २७ गाव भागातील ग आणि ई प्रभागातील बेकायदा चाळी, जोते पालिकेच्या तोडकाम पथकाने जमीनदोस्त केले. या चाळींमुळे परिसरातील सांडपाण्या्चे प्रवाह बंद झाले होते. त्यामुळे परिसरात दलदल निर्माण झाली होती. पावसाळ्यात हे सांडपाणी तुंंबून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असता. याबाबत पालिकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत, ई प्रभागाच्या प्रभारी साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या तोडकाम पथकाने ही कारवाई केली. आयरे गाव भागात बेकायदा चाळी उभारणीसाठी बांधलेले १० जोते तोडण्यात आले. दोन बेकायदा चाळी जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट करण्यात आल्या. भोपर येथील १५ खोल्यांच्या चाळी, रस्ते अडवून लावलेल्या टपऱ्या तोडण्यात आल्या. आयुक्त डाॅ. इंदूराणी जाखड नालेसफाईच्या दौऱ्यावर असताना त्यांना ही बेकायदा बांधकामे दिसून आली होती. त्यांंच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : कल्याणमधील ठाकरे गटाच्या नव्या नेमणुका, सामान्य शिवसैनिकांमध्ये नाराजी

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli illegal chawls demolished ahead of monsoon season css
First published on: 17-06-2024 at 16:28 IST