बदलापूरः लोकसभा निवडणुकीपासून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजप विरूद्ध भाजप आणि भाजप विरूद्ध शिवसेना असे चित्र दिसत असतानाच, आता शिवसेना आणि भाजपच्या महत्वाच्या नेत्यांकडून एकमेकांचेच पदाधिकारी फोडण्याचे राजकारण सुरू आहे. काही दिवसांपूर्वी टोकावडे ग्रामपंचायतीतील काही शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश झाला होता. त्यानंतर आता शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार यांनी खापरी ग्रामपंचायतीतील भाजपच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. यामुळे मुरबाड विधानसभेत महायुतीत सारे काही आलबेल नसल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकांपासून भिवंडी लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार कपिल पाटील आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्यात उघड दुफळी आहे. पाटील यांनी त्यांच्या पराभवाला आमदार कथोरे जबाबदार असल्याचे सांगत वेळ पडल्यास त्यांच्याविरूद्ध लढण्यासही तयार असल्याचे संकेत दिले होते. काही दिवसांपूर्वी मात्र त्यांचा सुर मावळल्याचे दिसून आले होते. मात्र पाटील आणि कथोरे यांच्यातील शीतयुद्ध सर्वश्रुत आहे. त्यातच शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी मुरबाड विधानसभा मतदारसंघाची मागणी करत थेट आमदार किसन कथोरे यांनाच आव्हान दिले होते. त्यामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजप विरूद्ध भाजप आणि भाजप विरूद्ध शिवसेना असा थेट संघर्ष पहायला मिळतो आहे. त्यातच गेल्या काही दिवसात महायुतीच्या या दोनही मित्र पक्षांमध्येच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फोडाफोडी सुरू असल्याचे चित्र आहे. ऑगस्ट महिन्याअखेरीस आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत टोकावडे भागातील काही शिवसेना पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे उपसरपंच, मुरबाड नगर पंचायतीचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे हा शिवसेनेला ग्रामीण भागात धक्का मानला जात होता. त्यानंतर नुकताच मुरबाड तालुक्यातील खापरी ग्रामपंचायतीतील सदस्य आणि गावातील भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. या प्रवेशामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघात महायुतीतील घटक पक्षांमध्येच उघड संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : ठाण्यात बंदीनंतरही अवजड वाहनांची वाहतूक सुरूच

सुभाष पवार कथोरेंविरूद्ध रिंगणात ?

शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघाची मागणी केल्यानंतर सुभाष पवारही मुरबाड मतदारसंघात कमालीचे सक्रीय झाल्याचे चित्र आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांचे शुभेच्छा फलक बदलापुरपर्यंत झळकले आहेत. त्यामुळे सुभाष पवार आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध विधानसभेच्या रिंगणात उतरणार की काय अशा चर्चा रंगल्या आहेत.

हेही वाचा : कल्याण: टिटवाळा येथे गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, कसाराकडे जाणारी लोकल सेवा ठप्प

मित्रपक्षात विसंवाद

गणेशोत्सवाच्या निमित्ताने नुकतेच मुंबईत आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या घटक पक्षांना एकमेकांना सांभाळून घेण्याचे आवाहन केले होते. वरिष्ठांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला असला तरी स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही पक्षातील विसंवाद दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे आगामी विधानसभेत महायुतीला फटका बसण्याची भीती व्यक्त होते आहे.