ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रस्ते, पाणी टंचाईची समस्या आणि आरोग्य सेवा सुधारण्यावर भर देत असतानाच दुसरीकडे ग्रामीण भागातील १३२ ग्रामपंचायतीतील पाण्याचे स्त्रोत दुषित असल्याची माहिती स्वच्छता सर्वेक्षण अभियानच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाचही तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा, शिक्षण तसेच शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जातात. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्यावतीने स्वच्छता सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाद्वारे जलस्त्रोतांची पाहणी केली जाते. त्यानुसार,गावांमधील नळ योजना, विहिरी, हातपंप या पाण्याच्या स्त्रोतांची पाहणी करुन संबधीत ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पाण्याचा दर्जा ठरवण्यात येतो. पाण्याच्या दर्जानुसार संबधीत ग्रामपंचायतींना लाल, पिवळे आणि हिरवे कार्ड दिले जाते. ज्या ग्रामपंचायतींमध्ये अतिदूषित पाण्याचा पुरवठा होतो, त्या ग्रामपंचायतींना लाल कार्ड, कमी दूषित पाण्याचा पुरवठा होणाऱ्या ग्रामपंचायतींना पिवळे आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणाऱ्या ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड दिले जाते. तर, ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये चार वर्षांच्या कालावधीत एकदाही जलजन्य आजाराची नोंद झाली नाही. त्या गावांना चंदेरी कार्ड दिले जाते.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जलस्त्रोतांची पाहणी करण्यात आली. यामध्ये पाच तालुक्यातील १३२ ग्रामपंचायतीत जलस्त्रोत मध्यम दुषित असल्याचे आढळून आले आहेत. या ग्रामपंचायतींच्या जलस्त्रोतांमध्ये दूषित पाण्याचा मोठ्या प्रमाणात निचरा होत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. तर, उर्वरित २८२ ग्रामपंचायतीत शुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

  • पाच तालुक्यातील ग्रामपंचायतींना दिलेले कार्ड

तालुका लाल कार्ड पिवळे कार्ड हिरवे कार्ड

कल्याण ०० ०३ ४३
भिवंडी ०० ०० १०४
अंबरनाथ ०० ०८ २०
मुरबाड ०० ६६ ६०
शहापुर ०० ५५ ५५

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane district rural areas contaminated water supply 132 gram panchayats got yellow cards asj