बदलापूरः अपुरे रस्ते प्रकल्प, वाहनांची वाढलेली संख्या आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे सध्या संपूर्ण ठाणे जिल्हा कोंडीत अडकला आहे. त्यातच नियोजनशून्य कारभार, अपुऱ्या आणि अरूंद उड्डाणपुलांमुळे सध्या कल्याण ते बदलापुरपर्यंत सर्वच शहरांमध्ये शहरांतर्गत वाहतूकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. अवघ्या काही मिनिटांच्या आणि किलोमीटरच्या अंतराला कापण्यासाठी दोन – दोन तास खर्ची घालावे लागत आहेत. कल्याण शहराबाहेर पडण्यासाठी, तिथून उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर हा प्रवास करण्यासाठी, तसेच या शहरांतील अंतर्गत पूर्व – पश्चिम प्रवास करण्यासाठी आज तासनतास लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे इंधन, वेळ आणि श्रम खर्ची पडत आहेत. त्यातूनही गंभीर म्हणजे स्थानिक नागरिक, नोकरदार यांना मोठा फटका बसतो आहे.
कल्याणचे प्रवेशद्वार कोंडीत
कल्याण शहरात प्रवेश करण्यासाठी पत्रीपूल, कल्याण बदलापूर मार्गावरील पूल आणि शहाड येथील असे तीन पूल आहेत. मात्र हे तीनही पूल सातत्याने कोंडीत अडकत आहेत. कल्याण बदलापूर मार्गावरून बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या शहरांतून कल्याण, भिवंडी, ठाणेच्या दिशेने जाणारी वाहतूक या मार्गाने होते. नव्याने खुला झालेला समृद्धी महामार्गावर पोहोचण्यासाठीही याच मार्गांचा वापर केला जातो आहे. या तीनही उड्डाणपुलांच्या दोन्ही बाजुंना वर्दळीचे रस्ते आहेत. त्यात रस्त्यांची दुरावस्था, पुलांच्या तोंडावर होत असलेली कोंडी यामुळे हे उड्डाणपुल कोंडीत अडकत आहेत.
उल्हासनगर, अंबरनाथमध्येही कोंडी
उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरात पूर्व पश्चिम प्रवासासाठी दोन उड्डाणपूल आहेत. त्यावर वर्दळीच्या वेळी कोंडी होत असते. मात्र कल्याण बदलापूर मार्गावर फॉलोवर लाईन, सतरा सेक्शन चौक, शांतीनगर चौकात सर्वाधिक कोंडी होते आहे. फॉलोवर लाईन चौक हे शहराचे प्रवेशद्वार असून येथे असमान रस्ते, अनेक छोटे रस्ते थेट मार्गाला येऊन मिळतात. येथे वाहने वळवताना सर्वाधिक कोंडी होते. अंबरनाथमध्ये हुतात्मा चौक आणि फॉरेस्ट नाका अशा दोनच ठिकाणी उड्डाणपुल आहेत. शहराची पूर्व पश्चिम वाहतूक या मार्गावरून होते. या दोन उड्डाणपुलांमध्ये चार किलोमीटरचे अंतर आहे.
बदलापूरचा एकमेव उड्डापूल
बदलापूर शहराचे बेलवली येथील टोक ते बदलापूर गावापर्यंतच्या सुमारे सात किलोमीटरच्या पट्ट्यात अवघा एकच उड्डाणपूल आहे. त्यामुळे शहरातील पूर्व पश्चिम प्रवासासाठी हा एकच पर्याय आहे. बेलवली भागातील अरूंद भुयारी मार्ग असला तरी येथून लहान वाहनेच जाऊ शकतात. मात्र तोही सध्या जोडरस्त्यांच्या कामासाठी बंद आहे. एकाच पुलामुळे शहर गेल्या काही दिवसांपासून कोंडीचा सामना करत आहे. विद्यार्थी, वाहनचालकांना याचा मोठा फटका बसतो आहे.
प्रस्तावित उड्डाणपूल कागदावरच
बदलापूर शहरात दोन उड्डाणपूल प्रस्तावित असून ते सध्या कागदावरच आहेत. अंबरनाथमधील एक उड्डाणपूल निर्मानाधिन आहे तर दुसरा कागदावर आहे. कल्याण शहराच्या वेशीवर वालधुनी ते कल्याण नगर महामार्ग या नवा पूल प्रगतीपथावर आहे. शहाड येथील उड्डाणपुलाचे रूंदीकरण प्रस्तावित आहेत. त्यामुळे उड्डाणपुलांमुळे होणारी कोंडी आणखी काही दिवस जैसे थे राहण्याची शक्यता आहे.
बदलापूरच्या भुयारी मार्गाचे काम पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. ते एक ते दोन दिवसात पूर्णत्वास जाईल. त्यानंतर उड्डाणपुलावरी भार कमी होण्याची आशा आहे. – मारूती गायकवाड, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर.