ठाणे : ठाण्यातील एका शाळेच्या उपक्रमांवर आणि शिक्षणपद्धतीवर इस्रायलमधील तरुणांचा मोह पडला आहे. विशेष भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील वातावरण, उपक्रम आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या संवादातून भारत-इस्त्रायल या दोन देशांच्या संस्कृतींची देवाणघेवाण झाली. इस्रायल तरुणांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी एकमेकांसोबत संवाद साधत एकमेकांच्या परंपरा, शैक्षणिक पद्धती, क्रिडा संस्कृती, खाद्य संस्कृती कला जाणून घेतल्या. या अनोख्या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही उत्साह दिसून आला.
शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे, येथे विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच दिले जात नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडविण्याचा प्रयत्न शिक्षक करतात. आपल्या शाळेतील विद्यार्थी भविष्यात उच्च स्तरावर पोहोचावेत, यासाठी प्रत्येक शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन सतत प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक, संगीत अशा विविध क्षेत्रांमध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवले जातात. तसेच विद्यार्थ्यांकडून स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून घेण्यावरही भर दिला जातो.
ठाण्यातील अशाच एका शाळेने अनोखा उपक्रम राबवित विद्यार्थी आणि पालकांची मने जिंकली आहे. या शाळेत इस्त्रायल देशातील काही तरुणांनी भेट दिली. हे इस्रायल तरुण शाळेचे व्यवस्थापन पाहून शाळेच्या प्रेमात पडले. तर, या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही उत्साह दिसून आला. ठाण्यातील नौपाडा भागात असलेल्या विद्या प्रसारक मंडळ संचलित ए.के. जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मंगळवारी इस्रायलमधील काही तरुणांनी भेट दिली. यावेळी शाळेने या विद्यार्थ्यांचे स्वागत अगदी पारंपारिक पद्धतीने केले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम सादर करत या इस्रायल पाहुण्यांना शाळेत आणले. तसेच संस्कृत लोकगीताचे सादरिकरण केले. त्यासह, देशभक्तीपर जयस्तुते हे गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. हे सर्व सादरिकरण पाहून इस्रायलचे हे तरुण मंत्रमुग्ध झाले होते. हे पाहूणे येणार म्हणून शाळेतील सर्व वर्गांबाहेर रांगोळी रेखाटण्यात आली होती. तसेच सर्व शाळा सजविण्यात आली होती. यावेळी या इस्रायल तरुणांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. या संवादातून एकप्रकारे भारत आणि इस्रायल या दोन देशातील संस्कृतीची देवाणघेवाण झाली. खाद्यसंस्कृती, क्रिडा, सण-उत्सव याविषयी विद्यार्थ्यांनी माहिती दिली. तसेच इस्रायल तरुणांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत काही खेळ देखील खेळले. या खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या उपक्रमात शाळेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी इस्रायल विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनी भारत आणि इस्रायलच्या सौहार्दपूर्ण संबंधांबद्दल चर्चा केली.