शाळांमधील संगणकांची बंद अवस्था, वीज खंडित असल्याने येणाऱ्या अडचणी, शिक्षकांची वानवा अशा नाजूक परिस्थितीत चालत असलेल्या कल्याण, डोंबिवलीतील पालिका शाळांत उपाययोजना राबवण्याऐवजी महापालिका शिक्षण मंडळाने ४० लाख रुपये खर्चून दहा हजार विद्यार्थ्यांची सहल काढण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे, मार्च-एप्रिलमध्ये विद्यार्थी वार्षिक परीक्षेला सामोरे जाणार असताना फेब्रुवारीत सहलीची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल आता पालकवर्ग आणि लोकप्रतिनिधींतून व्यक्त होत आहे.
कल्याण, डोंबिवली महापालिकेच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक शालेय सहलीसाठी आतापर्यंत पालिका अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद केली जात नव्हती. यावरून गेल्या वर्षी पालिकेच्या महासभेत टीकेची झोड उठल्यानंतर चालू अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांच्या सहलींसाठी सुमारे ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र शैक्षणिक व आर्थिक वर्ष संपत आल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या सहली न काढण्यात आल्याने हा निधी तसाच पडून होता. परंतु आता अचानक शिक्षण मंडळाला या निधीची आठवण झाली असून तो ‘मार्गी’ लावण्यासाठी दहा हजार विद्यार्थ्यांना सहल म्हणून ‘मुंबई दर्शन’ घडवण्याचा बेत त्यांनी आखला आहे. शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सुरेश आवारी यांनी सहलीसाठी बस पुरवण्यासाठी निविदाही काढल्या आहेत.
विशेष म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा शालेय सहलींचा काळ असतो, असे असताना फेब्रुवारीमध्ये शालेय सहलीची टूम काढण्याचे प्रयोजन काय, असा सवाल आता विचारण्यात येत आहे. त्यातच शिक्षण मंडळाची ही निविदा प्रक्रिया चुकीची असल्याचा आरोप मंडळाचेच उपसभापती अमित म्हात्रे यांनी केला आहे. निविदा प्रक्रियेतील त्रुटींमुळे पालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करत ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्त मधुकर अर्दड यांच्याकडे केली आहे. प्रशासनाधिकारी सुरेश आवारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिक्षण मंडळाच्या कारभाराची ‘शाळा’
’ महापालिकेचे शिक्षण मंडळ अस्तित्वात आल्यापासून नेहमीच टक्केवारी, निविदा प्रक्रियेत वादात सापडले आहे.
’ मागील काही महिन्यांपासून शासन आदेशाचा आधार घेऊन तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी शिक्षण मंडळाचे सर्व अधिकार काढून घेतले होते. या विरोधात सदस्यांनी महापालिका मुख्यालयासमोर उपोषण केले होते.
’ महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या वह्या, गणवेश, बूट या साहित्यात नेहमीच सावळागोंधळ दिसून येतो. या प्रक्रियेत मंडळातील अधिकाऱ्यांसह पदाधिकारी सहभागी असल्याची टीका वेळोवेळी सर्वसाधारण सभेत करण्यात आली आहे.
’ शिक्षण मंडळाच्या सदस्यांना अधिकार नसल्याने अनेक महिने मंडळाची सभा झालेली नाही. तरीही सदस्य कार्यालयात येऊन वेळ काढत असल्याचे चित्र आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivali municipal schools trip in february march