डोंबिवली – डोंबिवली पूर्व पालिकेच्या फ प्रभाग हद्दीत गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांनी गणेशभक्त, नवरात्रोत्सव भक्तांचे स्वागत करण्यासाठी पालिकेच्या परवानग्या न घेता रस्त्यांवर स्वागत कमानी लावल्या होत्या. या कमानी वाहतुकीला अडथळा ठरत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी राजकीय दबावाला न जुमानता या स्वागत कमानी पालिका फेरीवाला हटाव पथकाच्या माध्यमातून काढून टाकल्या.
या कमानींमुळे जेथे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा येत होता. त्या ठिकाणची वाहतूक आता सुरळीत झाली आहे. या कारवाईमुळे तक्रारदार नागरिक, परिसरातील रहिवासी, व्यापारी यांनी समाधान व्यक्त केले आहे. फ प्रभाग हद्दीत पालिका मालमत्ता विभागाच्या परवानग्या घेऊन उभारलेल्या कमानी, फलक यांनाच झळकविण्याचा, लावण्याची मुभा असेल. नियमबाह्य फलक, बेकायदा कमानी उभारण्यात आल्या तर त्या काढून टाकण्या येणार आहेत, असे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या काळात फ प्रभाग हद्दीतील टिळक रस्ता, शेलार नाका, स. वा. जोशी शाळा परिसर, ९० फुटी रस्ता, चोळे, ठाकुर्ली परिसरात सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांनी गणेश भक्तांच्या स्वागत करणाऱ्या कमानी, फलक लावले होते. हे फलक पालिकेच्या परवानग्या न घेता लावण्यात आले होते. त्यामुळे अशाप्रकारचे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव काळासाठी झळकविण्यात आलेले शुभेच्छा फलक, स्थानिक पदाधिकाऱ्यांचे वाढदिवस फलक यावेळी काढण्यात आले.
काही राजकीय स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमचे फलक का काढले, अशी विचारणा पथकाकडे केली. त्यावेळी तुम्ही फलक लावण्याची पालिकेची परवानगी आणि त्याचा शुल्क भरणा केलेली पावती फ प्रभागात आणून दाखवा, अशी सूचना साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी काही राजकीय पदाधिकाऱ्यांना केली. या प्रश्नाने काही पदाधिकारी निरूत्तर झाले.
फ प्रभागात गेल्या दोन दिवसात बेकायदा फलक हटविल्याने विद्रुप करण्यात आलेला परिसर आता स्वच्छ झाला आहे. फलक, कमानी काढण्याची कारवाई सुरू असताना, ९० फुटी रस्ता, चोळे, म्हसोबा चौक परिसरात पदपथावर हातगाडी लावून तेथे सिलिंडर ठेऊन वडापाव, समोसे खाद्य पदार्थ विकले जात होते. या विक्रेत्यांवर फेरीवाला हटाव पथकाने कारवाई करून त्यांचे सिलिंडर जप्त केले.
पदपथ मोकळा
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील पंडित नेहरू रस्त्यावर एका व्यापाऱ्याने दुकानाजवळील पदपथ प्लास्टिकचे कापड लावून पादचाऱ्यांसाठी बंद केला होता. पादचाऱ्यांना चालण्यासाठी असलेला पदपथ बंद केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी फेरीवाला हटाव पथक घेऊन बंद केलेला पदपथ मोकळा केला. त्या व्यापाऱ्याला असे पुन्हा न करण्याची तंबी दिली.
गेल्या दोन दिवसात फ प्रभागात १६० हून अधिक फलक, रस्ते वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या कमानी काढून टाकण्याची कारवाई केली. पालिकेची परवानगी असल्याशिवाय फ प्रभागात एकही बेकायदा फलक झळकू दिला जाणार नाही. पदपथ अडवून कोणीही व्यवसाय करू नये. त्यांच्यावर दंड आणि फौजदारी कारवाई केली जाईल.
हेमा मुंबरकर , साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग.