कल्याण- कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील फेरीवाले, अनधिकृत बांधकामे, बेकायदा फलकांवर आक्रमक कारवाई करण्यासाठी आयुक्तांनी उपायुक्त अनधिकृत बांधकामे नियंत्रण यांच्या नियंत्रणाखाली एक विशेष कारवाई पथक निर्माण केले आहे. हे पथक आयुक्त, उपायुक्तांनी आदेश दिल्यानंतर पालिकेच्या १० प्रभाग हद्दीत कोणत्याही क्षणी आणि वेळी जाऊन कारवाई करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिकेच्या १० प्रभाग हद्दीत फेरीवाले, अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष कारवाई पथके आहेत. या पथकांकडून अनेक वेळा फेरीवाले, अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या पालिका आयुक्तांपर्यंत तक्रारी येतात. या तक्रारींचा निपटारा करणे अनेक वेळा प्रशासकीय कामामुळे अधिकाऱ्यांना शक्य होत नाही. एखादी तक्रार आली आणि त्याचे आदेश साहाय्यक आयुक्तांना दिले तर अनेक वेळा अधिकारी कारवाईत कामचुकारपणा करत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले होते.

हेही वाचा >>> ठाणे : मनसे नेते अविनाश जाधव धमकी प्रकरणी सात जणांना नोटीस

प्रत्येक प्रभागात कारवाईसाठी १५ ते १६ कामगार तैनात आहेत. हे कामगार अतिक्रमण नियंत्रण, फेरीवाला हटाव पथकात काम करतात. तरीही शहरातील फेरीवाले, अतिक्रमणे हटत नसल्याने आयुक्तांनी आपल्या नियंत्रणाखाली एखादे कारवाई पथक असावे म्हणून विशेष मध्यवर्ति कारवाई पथक निर्माण केले आहे. हे पथक अतिक्रमण नियंत्रण उपायुक्तांच्या आदेशावरुन कारवाई करणार आहे.

दहा प्रभाग हद्दीत कोठेही कारवाई करायची असेल तर हे पथक उपायुक्तांच्या आदेशावरुन प्रभागांमधील आलेल्या फेरीवाला, बेकायदा बांधकामे तोडण्याची कामे करणार आहेत. प्रभागातील साहाय्यक आयुक्तांना हे पथक म्हणजे सूचक इशारा मानला जात आहे. अनेक वेळा साहाय्यक आयुक्त फेरीवाले, भूमाफियांशी संगनमत करुन कारवाई करण्यात हलगर्जीपणा करतात. मूळ तक्रार कायम राहते. या तक्रारीचा परस्पर निपटारा करण्यासाठी मध्यवर्ति कारवाई पथक महत्वाची भूमिका बजावणार आहे.

हेही वाचा >>> मुंबईत पाणीकपात, जलबोगद्याच्या दुरुस्तीमुळे शुक्रवारपासून महिनाभर टंचाई; ठाण्यालाही फटका

या कारवाई पथकात १० प्रभाग हद्दीतील प्रत्येक एक ते दोन कामगार नियुक्त करण्यात आला आहे. राजू शेलार, शाम कारभारी, जनन लोखंडे, राजू शिलवंत, दत्तू शेवाळे, दीपक गायकवाड, मनोज सरखोदे, कैलास म्हात्रे, केसरीनाथ पाटील, संजय पवार, विकास पाटील, संजय पवार, शरद मुंडे, नितीन देसले यांचा या उपायुक्तांच्या नियंत्रणाखालील कारवाई पथकात समावेश आहे.

पोलीस उपायुक्तांच्या नियंत्रणाखाली अशाप्रकारचे पथक सक्रिय आहे. कल्याण, डोंबिवली शहरात कुठे विशेष गुन्हा किंवा कारवाई करायची असेल तर स्थानिक पोलिसांच्या कारवाईची वाट न पाहता हे पथक उपायुक्तांच्या आदेशावरुन थेट कारवाई करुन मोकळे होते. पालिकेचे मध्यवर्ति पथक किती सक्रिय राहते की ते पण मिळमिळीत काम करते याकडे नागरिकांचे लक्ष असणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmc commissioner forms squad to remove hawkers encroachment in kalyan dombivli zws
Show comments