कल्याण- सफाई कामगाराचा खाकी गणवेश घालण्यास लागू नये. दररोज सकाळीच उठून रस्त्यावर झाडू मारण्याचे काम करावे लागू नये, म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागातील १७६ सफाई कामगार गेल्या दोन वर्षापासून पालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालय, विविध अधिकाऱ्यांच्या दालन, फेरीवाला हटाव पथकात शिपाई, इतर सेवकांच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीने आपल्या मूळ नियुक्तीच्या घनकचरा विभागात हजर व्हावे. विभाग प्रमुखांनी त्यांना कार्यमुक्त करावे. जे कामगार हजर होणार नाहीत, त्यांच्यावर कर्तव्यात कसूरपणाचा ठपका आणि त्यांचे वेतन रोखण्याची कारवाई करण्याचा इशारा आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिला आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली पूर्व भागात फेरीवाल्यांचे साहित्य जप्त, जुना फर्निचर बाजारावर कारवाई

करोना महासाथीच्या काळात वैद्यकीय सेवेसाठी कामगारांची गरज असल्याने दोन वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्तांनी सफाई कामगारांना पालिकेच्या विविध विभाग, प्रभाग कायार्लय, काळजी केंद्रे, रुग्णालयांमध्ये दैनंदिन करोना रुग्ण सेवेची कामे करण्यासाठी नियुक्त केले होते.

महासाथीनंतर घनकचरा विभाग उपायुक्त, सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी आदेश काढुनही दोन वर्ष उलटले तरी १७६ सफाई कामगार घनकचरा विभागात हजर झाले नाहीत. बहुतांशी सफाई कामगार विविध अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये शिपाई, काही फेरीवाला हटाव पथकात, काही प्रभागातील नागरी सुविधा केंद्रात सेवक म्हणून कार्यरत आहेत. कार्यालयात काम करताना वातानुकुलित गारेगार वातावरण, कामाचा भार नाही. साहेब सांगतील ती कामे करुन वेळेत घरी जाणे हा या कामगारांचा उपक्रम आहे.

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यात होणार अत्याधुनिक शाळांची निर्मिती; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रशासनाला आदेश

घनकचरा विभागात हजर झाले तर दररोज रस्त्यावर सफाईची कामे करावी लागतील. खाकी गणवेश घालावा लागेल, अशी भीती आहे. अनेक कामगारांना आता अंगमेहनत अंगवळणी राहिली नाही. बहुतांशी सफाई कामगार लोकप्रतिनिधींचा अधिकाऱ्यांवर दबाव आणून आपली घनकचरा विभागात पुन्हा बदली होणार नाही याची काळजी घेत आहेत. मागील वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. राजकीय दबावामुळे वरिष्ठ पालिका अधिकारी लोकप्रतिनिधींकडून नाहक आपणास त्रास नको म्हणून या फेरबदल प्रकरणात खूप आक्रमक भूमिका घेत नसल्याचे कळते. आता आयुक्त डाॅ. दांगडे यांनी गेल्या दोन वर्षातील संदर्भ देऊन सोमवारी नव्याने एक आदेश काढून पालिकेच्या विविध विभागात काम करत असलेल्या सफाई कामगारांनी तातडीने घनकचरा विभागात हजर राहण्याचे दिले आहेत.

सफाईत अडथळे

पालिकेच्या घनकचरा विभागात बाविसशे सफाई कामगार आहेत. प्रत्यक्षात सुमारे बाराशे ते तेराशे कामगार प्रत्यक्ष कामावर हजर असतात. काही कामगार आजारी, व्याधीग्रस्त, व्यसनांच्या आहारी गेल्याने नियमित कामावर येत नाहीत. त्यामुळे उपलब्ध सुमारे एक हजार सफाई कामगारांच्या माध्यमातून घनकचरा विभागाला १० प्रभाग हद्दीत दररोज सफाईची कामे करावी लागतात. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अनेक ठिकाणी सफाईची कामे होत नाहीत. नागरिकांच्या तक्रारी वाढतात. कचरा मुक्त शहर उपक्रम यशस्वी करण्यासाठी आणि शहर स्वच्छतेसाठी सफाई कामगारांची आवश्यकता असल्याने आयुक्तांनी सफाई कामगारांना घनकचरा विभागात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. विभाग प्रमुखांनी अशा कामगारांना तातडीने आपल्या विभागातून मुक्त करण्याचे आयुक्तांनी सूचित केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmc commissioner orders 176 cleaning workers to appear in solid waste department zws
First published on: 08-02-2023 at 17:05 IST