बेकायदा बांधकामाची नगरी अशी ओळख घट्ट होऊ लागलेल्या कल्याण डोंबिवली शहरात मोठय़ा संख्येने उभ्या राहाणाऱ्या बेकायदा बांधकामावर हातोडा चालविण्यात अपयशी ठरलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेने या बेकायदा घरांची विक्री थांबावी यासाठी आता ग्राहकांकडेच धाव घेतली आहे. कल्याण डोंबिवलीत एकही बैठे घर खरेदी करू नका, असे फर्मान पालिका प्रशासनाने काढले आहे. शहरविकास विभागाने एकाही बैठय़ा घराच्या बांधणीस परवानगी दिलेली नाही. त्यामुळे बैठी घरांची खरेदी बेकायदाच ठरेल, असेही प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
कल्याण डोंबिवली शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत सुमारे ५० हजारांहून अधिक बेकायदा बांधकामे उभी राहिल्याची माहिती यापूर्वीच पुढे आली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी आरक्षित असलेले भूखंड गिळंकृत करत त्यावर चाळी, बेकायदा बांधकामे उभारण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. आतापर्यंत याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाने अचानक बेकायदा बांधकामांविरोधात आपली मोहीम तीव्र केली आहे. याचाच एक भाग म्हणून शहराच्या विस्तारित भागांत तसेच गावांच्या हद्दीत उभारण्यात येणाऱ्या बैठी चाळी खरेदी करू नये, यासाठी पालिका प्रशासनाने ग्राहकांनाच आवाहन केले आहे.
महापालिका हद्दीतील एकाही बैठय़ा घराला कायदेशीर परवानगी दिली जात नाही. त्यामुळे बैठय़ा घरांच्या वसाहतींमधील घरे खरेदी करू नका, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. पावसाळ्यात बेकायदा बांधकामावर कारवाईची मोहीम थंडावते. त्यामुळे या काळात मोठय़ा प्रमाणावर चाळी आणि बांधकामे उभी राहतात. त्यामुळे घर खरेदीसंबंधी महापालिकेने प्रदान केलेल्या बांधकाम परवानगीविषयी नगररचना विभागातील संबंधित नगररचनाकार यांच्याशी संपर्क साधूनच पुढील पावले उचलावीत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
१ फेब्रुवारी ते १५ मे या चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे १४१३ बेकायदा बांधकामांवर कारवाई केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. या निष्काषणापोटी आतापर्यंत सुमारे दीड लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून ३१५ बेकायदा नळजोडण्याही खंडित करण्यात आल्या आहेत. ‘अ’ प्रभाग समितीअंतर्गत सर्वाधिक ९९३ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत, असा दावाही प्रशासनाने केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jun 2015 रोजी प्रकाशित
कल्याण-डोंबिवलीत बेकायदा घरांच्या खरेदीस बंदी
बेकायदा बांधकामाची नगरी अशी ओळख घट्ट होऊ लागलेल्या कल्याण डोंबिवली शहरात मोठय़ा संख्येने उभ्या राहाणाऱ्या बेकायदा बांधकामावर हातोडा चालविण्यात अपयशी ठरलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेने या बेकायदा घरांची विक्री थांबावी यासाठी आता ग्राहकांकडेच धाव घेतली आहे.
First published on: 06-06-2015 at 08:25 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmc illegal homes