महापालिकेकडून मिळणाऱ्या ५० लाखांच्या अनुदानाविषयी आयोजन समिती संभ्रमात
साहित्य संमेलनाचा खर्च अंदाजे पाच कोटी रुपयांच्या घरात जाणार हे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आयोजन समितीकडून निधीची जमवाजमव करण्याची लगबग सुरू आहे. संमेलनाच्या आयोजनासाठी राज्य शासनाकडून २५ लाख आणि पालिकेकडून ५० लाखांचा निधी मिळेल अशी खात्री समितीला आहे, मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेने मात्र अनुदान कोणत्या स्वरूपात देणार याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने आयोजन समितीसमोर मोठा पेच उभा राहीला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यासंबंधी महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, आयोजन समितीच्या एकंदर कारभाराविषयी सत्ताधारी शिवसेनेत काहीशी अढी असल्याने निधीचा पेच आगामी काळात अधिकाधिक गुंतागुंतीचा होईल, अशीच चिन्हे आहेत.
साहित्य संमेलनाच्या खर्चासाठी आयोजन समिती ‘आगरी युथ फोरम’ने पाच कोटी खर्च अपेक्षित असल्याचा अंदाज वर्तविला आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यासंबंधी मध्यंतरी महापौरांची भेटही घेतली होती. परंतु सत्ताधारी पक्ष शिवसेनेला आयोजन समिती फारशी विचारात घेत नसल्याने येथील पक्षाच्या नेत्यांमध्ये समितीच्या एकूणच कारभाराबाबत अढी आहे. त्यामुळे पालिकेकडून निधी वेळेत मिळेल की नाही या पेचात समितीचे पदाधिकारी सापडले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कल्याण डोंबिवली शहरात होत असल्याने नियमानुसार पालिका या संमेलनासाठी अनुदान देणार हे निश्चित आहे. महापालिका काही सोयी सुविधा समितीला देते, तसेच शहरातील विकासकामे त्यानिमित्ताने होतात. या कामांसाठी करण्यात येणाऱ्या खर्चातून हे अनुदान वळते करून घेतले जाईल, असा विचार महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी करत आहेत. सध्या आयोजन समितीला संमेलन कार्यालयासाठी पालिकेने भाडेतत्वावर जागा दिली आहे. तसेच क्रीडासंकुल व सावित्रीबाई फुले नाटय़गृहाचे भाडे आकारले जाणार आहे. यामध्ये हे अनुदान वळते केले जाण्याची शक्यता आहे. साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त ई रविंद्रन यांची भेट घेणे आणि निवेदन देणे गरजेचे आहे, अशी माहिती आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्याने दिली.
शिवसेना नेते नाराज
आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे कोणालाही विश्वासात घेत नाहीत. सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांची भेट घेणे टाळतात, असा सूर शिवसेनेच्या काही नेत्यांमध्ये आहे.