डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवलीत अग्निदेव मंदिराजवळ पायवाट बंद करून सात माळ्याची बेकायदा इमारत उभारणाऱ्या भूमाफियांना पालिकेच्या ह प्रभाग अधिकाऱ्यांनी कारवाईची नोटीस बजावली आहे. या नोटिसीला भूमाफियांनी उत्तर दिले नाहीतर पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशावरून ही बेकायदा इमारत भुईसपाट केली जाणार आहे.

जुनी डोंबिवलीत मुख्य वर्दळीची जुनी पायवाट बंद करून प्रकाश गोठे, शंकर ठाकूर या भूमाफियांनी गेल्या वर्षभराच्या कालावधीत ही बेकायदा इमारत उभारली आहे. विघ्नेश्वर कृपा आणि उदयराज या अधिकृत इमारतींच्या मध्यभागी नागरिकांच्या जाण्याच्या वाटेत ही बेकायदा इमारत दहशतीचा अवलंब करून भूमाफियांनी उभारली आहे. या बेकायदा इमारती विषयी तक्रारी वाढल्याने पालिकेच्या ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी या बेकायदा इमारतीच्या भूमाफियाला वरिष्ठांच्या आदेशावरून कारवाईची नोटीस पाठवली आहे.

हेही वाचा >>> कल्याण-कोल्हापूर कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये प्रवाशाचा ऐवज चोरीला

ही बेकायदा इमारत उभारताना भूमाफिया प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांनी सामासिक अंतर ठेवले नाही. इमारती बाहेर मुबलक जागा नसल्याने भूमाफियांनी इमारतीच्या एका व्यापारी गाळ्यामधून रहिवाशांना जाण्यासाठी रस्ता ठेवला आहे. या बेकायदा इमारतीत २५ सदनिका आहेत. तळ मजल्याला चार व्यापारी गाळे आहेत. एका गाळ्यात पालिकेची परवानगी न घेता दुकान सुरू करण्यात आले आहे. पालिकेच्या बाजार परवाना या दुकान चालकासह भूमाफियांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराकडून करण्यात येत आहे.

या बेकायदा इमारतीत सात माळे आहेत. पाचव्या माळ्यापर्यंत उद्ववाहनाची व्यवस्था इमारतीत आहे. या इमारतीत दुर्घटना घडल्यास या भागात अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका किंवा डम्पर वाहन येण्यास वाव नाही. अडगळीच्या ठिकाणी असलेली ही बेकायदा इमारत भुईसपाट करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

या तक्रारींची दखल घेऊन अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधूत तावडे यांनी ह प्रभाग साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना जुनी डोंबिवलीतील रस्ता अडवून उभारलेली बेकायदा इमारत, याच भूमाफियांनी उभारलेल्या फशी हाईट्स इतर कोपर, सखारामनगर काॅम्पलेक्स जवळील आरक्षित भूखंडावरील बेकायदा इमारती, कुंभारखाणपाडा, नवापाडा सुभाष रस्ता, राहुलनगरमधील रमाकांत आर्केड, सुदाम रेसिडेन्सी या बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचे लिखित स्वरुपात कळविले आहे.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये घटस्फोटीत महिलेची इमारतीच्या गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या

या बेकायदा इमारतीच्या सहाव्या, सातव्या माळ्यावर लाखो रूपये खर्च करून सदनिकांमध्ये सुशोभित फर्निचर उभारणीचे काम सुरू आहे. या इमारतीवरील पालिकेची कारवाई टाळण्यासाठी बनावट रहिवासी या इमारतीत घुसविण्याच्या हालचाली सुरू आहेत. पालिका अधिकाऱ्यांनी गोठे यांनी समाधानकारक खुलासा न केल्यास त्यांच्या रस्ते अडवून उभारणाऱ्या व फशी हाईट्स या दोन्ही बेकायदा इमारतीवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. ह प्रभागातील अधिकाऱ्यांनी गोठे यांच्यावर आवश्यक कारवाई सुरूकेली असल्याचे सांगितले.

डोंबिवली पश्चिमेतील तक्रारप्राप्त जुनी डोंबिवलीसह इतर सर्व बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचे लिखित आदेश ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यांनी विहित प्रक्रिया पार पाडून या बेकायदा इमारतीवर कारवाई करायची आहे. अवधूत तावडे , उपायुक्त, अतिक्रमण नियंत्रण.