भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या उमेदवारांना टक्कर देण्याबरोबरच पक्षाचे अस्तित्व टिकवण्याची कसरत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीपासून पक्षात सुरू झालेली गळती आजही सुरूच आहे. बदलापूर पालिका निवडणुकीसाठी पक्षाने ४७ प्रभागांपैकी २३ प्रभागात उमेदवार उभे केले आहेत. हा काळ पक्षासाठी अग्निपरीक्षेचा ठरणार आहे. यात कितपत यश मिळते आणि पक्ष किती ठिकाणी तग धरून आहे. हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे आपल्या जिवाला धोका आहे, असे सांगत भाजपवासी झाले. त्यांच्याबरोबर त्यांचे समर्थक नगरसेवक, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच पक्षातील त्यांच्या विरोधकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या सर्व घडामोडींमुळे शहरात राष्ट्रवादीचे अस्तित्त्वच पणाला लागले. परिणामी उरलेल्या मंडळींवर पक्षाची धुरा सोपवण्याशिवाय पक्ष श्रेष्ठींकडे पर्याय नव्हता. त्यातूनच कालिदास देशमुख यांची शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. गेल्या पालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेला मात्र तरीही राष्ट्रवादीमध्ये रमलेला एकमेव नगरसेवक सोडला तर पक्षाचे पालिकेत आता अस्तित्वच नाही. स्वत:च्या नावापुढे विशेष नाम धारण करून शहरातील विविध भागातील फलकांवर झळकण्याची ‘तडफदारी’ दाखवण्यातच त्यांनी पाच वर्षे खर्ची केल्याची टीका पक्षातील जाणकारांकडून करण्यात येत आहे. या नव नगरसेवकाला पक्षाध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पडेल, अशी अपेक्षा होती. परंतु पक्ष श्रेष्ठींनी अखेर कालिदास देशमुख यांनाच पक्षाचे ‘कॅप्टन’ केले. त्यामुळे निवडणुकीत देशमुख यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
तीन अर्ज नामंजूर
राष्ट्रवादीतर्फे २६ प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. पंरतु तीन प्रभागातील उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले. त्यामुळे २३ प्रभागातच पक्षाचे उमेदवार आहेत. आशिष दामले, त्यांची पत्नी प्रियंका, अक्षय भाटकर, दिनेश धुमाळ, शोभा सोनावणे, प्रतिभा माने आदींना उमेदवारी देण्यात आली आहे. नविन चेहेऱ्यांना पक्षाने संधी दिली आहे. पक्षाला किमान १५ प्रभागात यश मिळेल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
सेना-भाजपचे निवडणुकीआधीच खाते ; बदलापूरमध्ये दोन, अंबरनाथमध्ये एक बिनविरोध
बदलापूर, : अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी बुधवारी रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्जाची छाननी व त्यावर घेण्यात आलेल्या हरकतींच्या सुनावणीची प्रक्रिया सुरू होती.  बदलापुरात छाननीदरम्यान वीस उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्याचप्रमाणे दरवेळी प्रमाणे याही वेळी प्रभाग क्र. १ची जागा बिनविरोध झाली असून प्रभाग क्र. १७ मध्ये भाजपच्या निशा घोरपडे याही बिनविरोध निवडून आल्या आहेत.
या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने या जागा बिनविरोध झाल्या. बदलापुरात ४७ प्रभागांसाठी एकूण २२४ अर्ज दाखल झाले होते. यातील वीस उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद झाले असून २०४ अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. तर, १७ उमेदवारांनी दुबार अर्ज भरल्याने आता १८७ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.  
अंबरनाथमध्ये छाननी प्रक्रियेला दोन दिवस
अंबरनाथमध्ये निवडणूकीसाठी ५३० उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे बुधवारी सकाळी सुरू झालेली उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया रात्री उशिराही सुरूच राहिली. गुरुवारी पहाटे ही प्रक्रिया संपली. बाद करण्यात आलेल्या उमेदवारांच्या हरकतींवर सुनावणी घेण्यात येत असल्याने  किती उमेदवार अपात्र ठरविण्यात आले व किती वैध ठरविण्यात आले याची माहिती प्रसिद्ध करणार असल्याचे अंबरनाथ पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अंबरनाथमध्ये पालेगाव येथील प्रभाग क्र. ५६ च्या शिवसेना उमेदवार योगिता वारिंगे यांची जागा बिनविरोध झाल्याची माहिती मिळत असून त्यासंबंधीची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही.
समीर पारखी, बदलापूर