गडकरी रंगायतनात ‘इंद्रधनू लोकसत्ता रंगोत्सव’

ठाणे :  साहित्य, संगीत कार्यक्रमांची रेलचेल आणि मान्यवरांची मांदियाळी असलेला ‘इंद्रधनू लोकसत्ता रंगोत्सव २१’ आज (शनिवारी) ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सायंकाळी साडेचार वाजल्यापासून रंगणार आहे. विविध क्षेत्रांत नावीन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा या सोहळय़ात ‘युवोन्मेष’ आणि ‘ठाणे मानिबदू पुरस्कारा’ने सन्मान करण्यात येणार आहे.  ठाणे शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात इंद्रधनू लोकसत्ता रंगोत्सवला मानाचा महोत्सव अशी ओळख निर्माण झाली आहे. या महोत्सवाची ठाणेकर नागरिक आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा या महोत्सवाचे २५ वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रमाची रेलचेल रंगोत्सवात असणार आहे. मात्र करोना नियमांचे पालन करूनच हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सायंकाळी साडेचार वाजल्यापासून रंगणारा हा सोहळा दोन सत्रांत रंगणार आहे. पहिल्या सत्रात कवयित्री शांता शेळके आणि कविवर्य वसंत बापट यांच्या जन्मशताब्दी वर्षां निमित्ताने त्यांच्या अजरामर साहित्यकृतींचे अभिवाचन आणि सोबत त्यांच्या सुमधुर गीतांचा नजराणा ‘असेन मी, नसेन मी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडणार आहे. हा कार्यक्रम डॉ. आशुतोष जावडेकर, डॉ. गिरीश ओक, स्पृहा जोशी, अमेय ठाकुरदेसाई, अमोघ दांडेकर, झंकार कानडे आणि सावनी रिवद्र रसिकांसमोर सादर करणार आहेत. दुसऱ्या सत्रात ‘मेलोडिज ऑफ ग्रॅंड पियानो’ हा आगळावेगळा कार्यक्रम रंगणार आहे. ग्रॅण्ड पियानोचे अनेकांना नेहमीच अप्रूप वाटत आले आहे. या ग्रॅंड पियानोचे स्वर प्रत्यक्ष ऐकण्याचा अनुभव मंदार पारखी यांच्या संगीत संयोजनात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांना मिळणार आहे. या कार्यक्रमात गायक जयदीप बगवाडकर, सोनाली कर्णिक, अमेय ठाकूरदेसाई, अमोघ दांडेकर, दत्ता तावडे , किशोर नारखेडे, विजू तांबे हे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन विघ्नेश जोशी करणार आहेत.

पुरस्कार सोहळा

विविध क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या तरुणाईला १९९८ पासून इंद्रधनू महोत्सवामध्ये युवोन्मेष पुरस्काराने तर, विविध क्षेत्रात कर्तृत्वाची मोहोर  उमटवणाऱ्या एका ठाणेकर व्यक्तीला ठाणे मानिबदू पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाही रंगोत्सवात हा पुरस्कार सोहळा पार पडणार असून यंदाच्या युवोन्मेष पुरस्काराने बॅडिमटन पटू विघ्नेश देवळकर या युवा खेळाडूला सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाचा सुधीर फडके युवोन्मेष पुरस्कार युवा संगीत संयोजक व संचालक आनंद सहस्त्रबुद्धे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर, शिक्षण तज्ज्ञ आणि नाटय़कर्मी डॉ. विजय जोशी यांना ठाणे मानिबदू पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.